आधी न मागता पाठिंबा, आता बसपाची काँग्रेससमोर नवी अट
नवी दिल्ली : राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेसने मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली खरी, पण आता बसपाने एक नवी अट समोर ठेवली आहे. 2 एप्रिल रोजी भारत बंद आंदोलनादरम्यान बसपाच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, अन्यथा पाठिंबा काढण्याबाबत विचार करु, असा इशारा बसपा अध्यक्ष मायावती यांनी दिलाय. मध्य प्रदेश आणि […]
नवी दिल्ली : राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेसने मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली खरी, पण आता बसपाने एक नवी अट समोर ठेवली आहे. 2 एप्रिल रोजी भारत बंद आंदोलनादरम्यान बसपाच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, अन्यथा पाठिंबा काढण्याबाबत विचार करु, असा इशारा बसपा अध्यक्ष मायावती यांनी दिलाय.
मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमतापासून दूर रहावं लागलं होतं. यानंतर बसपाने काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी एक ते दोन जागांची आवश्यकता होती. काँग्रेसने पाठिंब्याची मागणी करण्याअगोदरच बसपाने पाठिंबा दिला. पण आता गुन्हे मागे घेण्यासाठी बसपाने अट ठेवली आहे.
बसपाने एक पत्रक जारी केलंय. ज्यात म्हटलंय की, “भारत बंद आंदोलनात उत्तर प्रदेशसह भाजपशासित राज्यांमध्ये जातीय द्वेषातून अनेकांना अडकवण्यात आलंय. हे खटले काँग्रेस शासित राज्य मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मागे घेण्यात यावेत, अन्यथा आम्ही बाहेरुन पाठिंबा देण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करु”
काँग्रेससोबत जागा वाटपाचा फॉर्म्युला न जमल्यानंतर बसपाने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. या दोन्ही राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय, पण बहुमतापासून दूर आहे. त्यामुळे बसपाने पाठिंबा जाहीर केला खरा, पण आता नवी मागणी समोर ठेवली आहे.
राजस्थानचा निकाल
राजस्थान विधानसभा निवडणुकीत 199 पैकी 99 जागा काँग्रेसने तर 73 जागा भाजपने जिंकल्या. अन्य पक्ष आणि अपक्षांना मिळून 27 जागा मिळाल्या. शिवाय सपा-बसपाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने बहुमताचा आकडा आता पूर्ण केला आहे.
राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल (199) :
काँग्रेस – 99
भाजप – 73
इतर – 27
मध्य प्रदेश (230) :
काँग्रेस – 114
भाजप -109
बसपा – 02
सपा – 01
इतर – 04