माढ्यातून माघार घेण्याचा आणि माझ्या उमेदवारीचा काही संबंध नाही : पार्थ पवार
रायगड : माढ्यातून माघार घेण्याचा आणि माझ्या उमेदवारीचा काही संबंध नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे उमेदवार आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी म्हटलंय. शिवाय उमेदवारी जाहीर झाल्यापासून आजोबा शरद पवार यांच्यासोबत बोलणं झालेलं नाही, असंही त्यांनी सांगितलं. पण प्रचारात त्यांचं मार्गदर्शन असतं, असं पार्थ पवार म्हणाले. घराणेशाही आम्हाला निश्चित मान्य नाही. पवारसाहेबांनी म्हटल्याप्रमाणं […]
रायगड : माढ्यातून माघार घेण्याचा आणि माझ्या उमेदवारीचा काही संबंध नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे उमेदवार आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी म्हटलंय. शिवाय उमेदवारी जाहीर झाल्यापासून आजोबा शरद पवार यांच्यासोबत बोलणं झालेलं नाही, असंही त्यांनी सांगितलं. पण प्रचारात त्यांचं मार्गदर्शन असतं, असं पार्थ पवार म्हणाले.
घराणेशाही आम्हाला निश्चित मान्य नाही. पवारसाहेबांनी म्हटल्याप्रमाणं एकाच घरात किती तिकीटं देणार. राष्ट्रवादीत घराणेशाही आहे असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली. शरद पवार यांनी पार्थला तिकीट देत असल्यामुळे आपण माढ्यातून माघार घेत असल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान, पार्थ पवार एका वादग्रस्त ख्रिश्चन धर्मगुरुकडे गेल्यामुळे ट्रोल झाले. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. चर्चमध्ये गेलो, ट्रोल झालं, काही चूक झाल्या त्याला काही करु शकत नाही. कार्यकर्त्यांच्या भावना असतात त्यामुळं जावं लागतं. चर्चमधल्या धर्मगुरुबद्दल काही आक्षेप होते, त्यात माझी काय चूक, असा सवालही पार्थ पवार यांनी केला.
पहिल्या भाषणाबद्दलही पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. पहिलं भाषण जरा नीट झालं नाही, पहिल्या प्रयत्नात असं होतंच. इंग्रजी माध्यमातून शिकलो म्हणून मराठी येत नाही असं नाही. सराव झाला की मराठी येतं. कितीतरी लोकांना भाषेचं ज्ञान नसतं, पण ते चांगलं काम करुन दाखवतात, असंही पार्थ पवार म्हणाले.
पवार कुटुंबात वाद असल्याचं भाजपकडून म्हटलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत वक्तव्य केलं होतं. यावर पार्थ पवारांनी स्पष्टीकरण दिलं. आमच्या घरात काहीही वाद नाही. मलाही तिकिटासाठी खूप झगडावं लागलं. कार्यकर्त्यांची इच्छा होती मी निवडणूक लढवावी म्हणून निवडणुकीत उतरलो. तिकीट जाहीर झाल्यापासून पवारांशी बोललो नाही. पण प्रचाराचा त्यांचं मार्गदर्शन असतं, असं पार्थ पवार म्हणाले.
दरम्यान, पार्थ पवार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चाहते आहेत. राज ठाकरे यांचा मी फॅन आहे आणि फॅन राहिल. मनसेचा आघाडीला नक्कीच फायदा होईल, असं पार्थ म्हणाले.