मुंबईः मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्याविरोधात महिला संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवरून तीव्र आक्षेप घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सातत्याने तिच्यावर सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून टीका केली. तसेच पोलीसांकडे तिच्याविरोधात तक्रार देखील केली आहे. आता विविध महिला संघटनांनीही उर्फी जावेदविरोधात सडेतोड भूमिका घेतली आहे. संघटनांनी महिला आयोगाला पत्र लिहिले असून तिला कपड्यांविषयी समज द्यावी, अशी मागणी केली आहे. महिला आयोगाने काहीही कारवाई केली नाही तर बिभत्स कपड्यांमध्ये उर्फी जिथे दिसेल तिथे जाऊन तिला चोपणार, असा इशारा महिला संघटनांनी दिला आहे.
आम्ही सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम राबवतो. याद्वारे महिला सक्षमीकरणाचे, गुड टच, बॅड टच असे उपक्रम राबवतो. आम्ही समाजात जागृती करत असताना उर्फी जावेदसारखी महिला पब्लिक प्लेसमध्ये पैसे कमावण्यासाठी अश्लील कपडे घालते.
अर्ध नग्न कपडे घालते… आज तर ती फक्त नेकलेस घालून आली… भारतीय संस्कृतीचा ऱ्हास करण्याचं काम उर्फी जावेद करतेय, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कारण देते… पण या पद्धतीचं स्वातंत्र्य आम्ही तिला घेऊ देणार नाही, असा इशारा संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे.
उर्फी जावेदविरोधात महिला आयोग कारवाई करू शकतो. त्यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे. तिला समज द्यावी, तसेच गूगलने तिच्यावर बंदी घालावी, अशी विनंती करावी, असे पत्रही आम्ही आयोगाला दिले आहे.
उर्फी ही तरुण पिढीची आदर्श होईल का? उर्फीचे सोशल मीडियावरचे फोटो पाहून मुलांची मानसिकता बिघडली तर अत्याचाराला बळी पडणारी सामान्य घरातील महिला असते. उर्फी अशा वेळी सुरक्षित राहील….
सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवण्याचा आरोप तिच्यावर करण्यात येतोय. चित्रा वाघ यांनी तिच्याविरोधात पोलीसात तक्रार देखील दिली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना उर्फी जावेदने दिल्ली येथील बलात्कार प्रकरणाचा एक व्हिडिओ शेअर केला.
या प्रकरणात तुम्ही मदत केली तर जास्त योग्य ठरेल, अशा आशयाचं ट्विट तिने केलं. त्यानंतर चित्रा वाघ यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलंय. उर्फी जावेद मला कुठे भेटली तर तिला थोबडवून काढेन, आणि मग ट्विट करेन. पण महाराष्ट्रात हा नंगा नाच चालू देणार नाही, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली आहे.