मुख्यमंत्रिपदाबाबत विजय वडेट्टीवार यांचं नवं विधान; म्हणाले, एकनाथ शिंदे…
Vijay Vadettiwar on CM Eknath Shinde ; राज्याचं मुख्यमंत्रिपद, एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्रिपदाबाबत विजय वडेट्टीवार यांचं नवं विधान. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दाव्यालाही उत्तर म्हणाले...
यवतमाळ | 19 ऑगस्ट 2023 : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत एक वक्तव्य केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. येत्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात मोठे बदल होणार आहेत. एकनाथ शिंदे हे सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होतील असं म्हटलं. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024 पर्यंत शिंदे मुख्यमंत्री राहतील, असं सांगितलं. त्यावरून चर्चांना उधाण आलेलं असतानाच वडेट्टीवार यांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. बावनकुळे यांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील, हे बावनकुळे सांगत असतील तर त्यावर माझा विश्वास अजिबात नाही. कारण बावनकुळेंना किती माहिती आहे मला माहिती नाही. त्यांचा सोर्स काय आहे हे मला माहिती नाही. खरतर राज्यात मुख्यमंत्री कोण? असा सवाल विचारला जातोय. शिंदेंचा मुलगा मुख्यमंत्री की तीन उपमुख्यमंत्री? जे मुख्यमंत्री झाले त्यांना काम करू दिलं नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.
ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते अर्धे मुख्यमंत्री झाले. अर्ध्यामधून त्यांचा अर्धा हिस्सा पुन्हा काढून घेतला. 105 लोक घेऊन पाव हिस्सा घेतला. तर ही मंडळी स्वस्थ बसणारी नाहीत. माझ्याकडे जी माहिती आहे, ती खरी आहे. जोवर सरकार चाललं आहे. तोवर बावनकुळेंना त्यांच्याच बाजूने बोलावं लागणार आहे. पण माझा सोर्स मला सांगतो की राज्याचा मुख्यमंत्री बदलणार आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं आहे.
सत्तेच्या खुर्चीसाठी वाट्टेल ते महाराष्ट्रात चाललेलं आहे. येत्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात मोठे बदल होतील. राज्यातील जनतेला हे बदल पाहायला मिळती. राज्याच्या प्रमुखपदाच्या खुर्चीपासून बदलला सुरुवात होईल. सप्टेंबर महिन्यात प्रचंड बदल होतील. सत्ता बदलेल म्हणजे आमची सत्ता येईल असं मी म्हणत नाही. मुख्यमंत्रिपदात बदल होतील, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
आगामी निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केलंय. निवडणूका आता होणार नाहीत. सर्व पक्ष तयारी करत आहेत. आमची इंडियाची बैठक मुंबईत होणार आहे. जागावाटपावर अद्याप चर्चा नाही. उमेदवारांबाबत चर्चा नाही. पण सध्या पक्षाचा विस्तार करणं हेच एक डोळ्यासमोर काम आहे, असं वडेट्टीवार म्हणालेत.