लाट ओसरली, मोदी नव्हे ‘योगी फॉर पीएम’चे फलक झळकले!
लखनऊ: पाच राज्यांमधील पराभवानंतर मोदी लाट ओसरल्याची चर्चा देशभरात सुरु आहे. या पराभवानंतर आता भाजपमध्येच कुरघोड्या सुरु झाल्या आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये त्याची सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशात योगी फॉर पीएम अर्थात पंतप्रधानपदासाठी योगी आदित्यनाथ यांना उमेदवारी द्या असे फलक लावण्यात आले आहेत. एका बाजूला मोदी आणि दुसऱ्या बाजूला योगी आदित्यनाथ यांचा फोटो लावण्यात […]
लखनऊ: पाच राज्यांमधील पराभवानंतर मोदी लाट ओसरल्याची चर्चा देशभरात सुरु आहे. या पराभवानंतर आता भाजपमध्येच कुरघोड्या सुरु झाल्या आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये त्याची सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशात योगी फॉर पीएम अर्थात पंतप्रधानपदासाठी योगी आदित्यनाथ यांना उमेदवारी द्या असे फलक लावण्यात आले आहेत. एका बाजूला मोदी आणि दुसऱ्या बाजूला योगी आदित्यनाथ यांचा फोटो लावण्यात आला आहे. या होर्डिंगच्या वरील बाजूला योगी फॉर पीएम #Yogi4PM, योगी लाओ देश बचाओ असं लिहिण्यात आलं आहे. तर मोदींच्या फोटोखाली ‘जुमलेबाजी का नाम मोदी’ विरुद्ध योगींच्या फोटोखाली ‘हिंदुत्व का ब्रांड योगी’ असं लिहिलं आहे.
यूपीची राजधानी लखनऊमध्ये दोन-तीन ठिकाणी हे होर्डिंग्स रातोरात लावण्यात आले आहेत. सकाळी लोकांना हे फलक निदर्शनास आले. काहींनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
या होर्डिंगवर 10 फेब्रुवारीला लखनऊमधील रमाबाई मैदानात होणाऱ्या कोणत्या तरी धर्मसंसदेबाबतही लिहिलं आहे. हे होर्डिंग उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेने लावले आहेत. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. तूर्तास हे होर्डिंग हटवण्यात आलं आहे.
दरम्यान, हे होर्डिंग यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादवांच्या जवळचा सहकारी अमित जानीने लावल्याचं समजतंय. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने सत्ता गमावल्यानंतर खोडसाळपणे हे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना ही संघटना चालवणाऱ्या अमित जानीची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे. मात्र त्यांचा भाजपशी थेट संबंध नाही. यापूर्वी मायावतींची मूर्ती तोडफोडप्रकरणात त्यांचं नाव आलं होतं.