आदित्य ठाकरेंविरोधात महाआघाडीचा उमेदवार ठरला?
आदित्य ठाकरेंविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे घटनातज्ञ अॅड. सुरेश माने (Worli Suresh Mane) हे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
मुंबई : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पुरोगामी पक्षाच्या आघाडीच्या वतीने तगडा उमेदवार (Worli Suresh Mane) देण्याची तयारी केली आहे. आदित्य ठाकरेंविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे घटनातज्ञ अॅड. सुरेश माने (Worli Suresh Mane) हे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ते वरळी विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. आदित्य ठाकरेंनी मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. यातून त्यांनी विधानसभा निवडणुकीत शक्तीनिशी उडी घेतल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे लोकांमधून निवडणूक लढवणारे ते ठाकरे घराण्यातील पहिलेच सदस्य ठरणार आहेत.
आदित्य ठाकरे 2 किंवा 3 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजप-शिवसेना युतीच्या अधिकृत घोषणेकडेच शिवसेनेचं लक्ष असल्याचंही बोललं जात आहे. युतीची घोषणा लांबल्यामुळे आदित्य यांची उमेदवारी पक्षाने अद्याप अधिकृतपणे घोषित केली नाही. युतीच्या घोषणेनंतर शिवसेना तात्काळ स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने त्या दिवशी वरळीत शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन होण्याचीही शक्यता आहे.
शिवसेनेत दाखल झालेले सचिन अहिर यांनी कार्यकर्ता मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केले होते. त्यावेळी अहिर यांनी आदित्य ठाकरेंना आता तरी वरळी विधानसभेचा पेपर फोडा असं आवाहन केलं होतं. मात्र “युतीचं चित्र स्पष्ट न झाल्याने सध्या पेपर तपासणी सुरु आहे. नंतरच खरे पेपर फुटतील”, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं होतं.
सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि वरळी विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार असणार अशी चर्चा सुरु झाली. वरळी मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांचा सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने पत्ता कट होणार का, असाही प्रश्न उपस्थित केला गेला. मात्र, वरळीत सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी शक्ती प्रदर्शन केलं आहे.