नोटबंदी कसली, ती तर माझ्या बापाची वाटबंदी, कवितेतून मोदींवर हल्लाबोल करणाऱ्या कृषीकन्येला आदित्य ठाकरेंचं मोठं गिफ्ट
प्रियांका जोशी ही चार वर्षापूर्वी शेतकरी आंदोलनावेळी चर्चेत आली होती. शिवसेनेने नाशिकमध्ये शेतकरी मेळावा घेतला होता. "आमचा बाप कन्यादानापर्यंत टिकला पाहिजे, म्हणून कर्जमाफी मागतोय" असं खणखणीत भाषण करणारी प्रियांका त्यावेळी चर्चेत आली होती.
धुळे : आपल्या कविवेतून थेट मोदी सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या प्रियांका जोशी (Priyanka Joshi) या तरुणीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे. धुळ्याची कृषीकन्या प्रियंका जोशीला युवती सेनेच्या (Yuva Sena) बुलढाणा अकोला जिल्हा विस्तारकपदी नियुक्त केलं आहे. युवतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावं नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी प्रियांका जोशीला महत्त्वाचं पद देण्यात आलं.
प्रियांका जोशी ही चार वर्षापूर्वी शेतकरी आंदोलनावेळी चर्चेत आली होती. शिवसेनेने नाशिकमध्ये शेतकरी मेळावा घेतला होता. “आमचा बाप कन्यादानापर्यंत टिकला पाहिजे, म्हणून कर्जमाफी मागतोय” असं खणखणीत भाषण करणारी प्रियांका त्यावेळी चर्चेत आली होती. याशिवाय प्रियांकाने मोदींवर केलेली कविताही खूपच गाजली होती.
प्रियांका जोशीची गाजलेली कविता
अच्छे दिनाने शेतकऱ्यांची कंबरडी मोडली,
आमच्या भाजीपाल्याला भाव ने देता, तुम्ही तुमचीच गाजरं विकली,
तुमचीच सत्ता, तुमचंच सरकार असल्याने, तुम्हाला कुणाचा असणार धाक?
मोदीची तुमच्याही खात्यात आले का हो 15 लाख?
काळा पैसा बाहेर येण्याच्या धुंदीत तुम्ही नोटबंदी केली,
नोटबंदी कसली, ती तर माझ्या बापाची वाटबंदी होती
युवासेनेच्या पदाधिकारी
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना युवती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे . धुळे जिल्ह्याच्या कृषीकन्या प्रियंका जोशी हिची बुलढाणा आणि अकोला जिल्हा विस्तारकपदी वर्णी लागली आहे.
आपल्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलीवर युवासेनेने विश्वास दाखवून सर्वात मोठी जबाबदारी दिली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची आभारी आहे, असं प्रियांका जोशीने म्हटलं.
एखाद्या राजकारणातल्या बड्या नेत्यांच्या मुलांनाच पक्षाचे पद दिले जातात, अनेकांमध्ये गैरसमज आहे हेच गैरसमज माझ्यासारख्या तळागाळातील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलीला मोठ्या पदाची जबाबदारी देऊन पक्षाने दूर केलं आहे. त्यामुळे मी पक्षाची ऋणी आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी कन्या प्रियंका जोशी यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या
कोरोनापाठोपाठ मुंबईला डेंग्यू, मलेरियाचा ‘ताप’; रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढली