‘अॅस्ट्राझेनेका’च्या कोरोना लशीला ब्रेक, प्रतिकूल परिणामांमुळे पुण्यात चाचणीला स्थगिती
पुण्यात सुरु असलेल्या चाचणीत सहभागी व्यक्तीवर संशयास्पद प्रतिकूल परिणाम दिसल्याने लसीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : जगभराचे डोळे लागलेल्या कोरोना विषाणूवरील लशीच्या पुण्यातील चाचणीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. ‘अॅस्ट्राझेनेका’ आणि ‘ऑक्सफर्ड विद्यापीठ’ विकसित करत असलेल्या कोव्हिड 19 लशीची चाचणी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. पुण्यात सुरु असलेल्या चाचणीत सहभागी व्यक्तीवर संशयास्पद प्रतिकूल परिणाम दिसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. (AstraZeneca puts leading COVID19 vaccine trial on hold)
पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट’मध्ये कोव्हिड 19 लशीची चाचणी आणि उत्पादन केले जात होते. पुण्यातील पाच जणांपासून ही मानवी चाचणी सुरु झाली. त्यापैकी तिघा जणांमध्ये अँटीबॉडी दिसल्याने ते बाद ठरले, तर दोघांना वैद्यकीय त्रास सुरु झाले.
कोव्हिड 19 वर लस तयार करण्याच्या शर्यतीत अग्रणी असलेल्या ‘अॅस्ट्राझेनेका’च्या प्रवक्त्यांनी एका निवेदनात म्हटले, की कंपनीच्या आढावा प्रक्रियेत लसीकरण संशोधनाला विराम देऊन सुरक्षेबाबत पुन्हा आढावा घेण्याचे ठरले.
AstraZeneca puts leading #COVID19 vaccine trial on hold over safety concern: Reuters
— ANI (@ANI) September 9, 2020
सहभागी व्यक्तीवर दिसलेल्या प्रतिकूल प्रतिक्रियेचे स्वरुप आणि ते केव्हा झाले, हे समजलेले नाही, मात्र त्याची प्रकृती ठीक होण्याची अपेक्षा केली जात आहे.
“जेव्हा एखाद्या चाचणीमध्ये संभाव्य अज्ञात आजार दिसतो, तेव्हा असे निर्णय घ्यावे लागतात. मात्र आम्ही या चाचणीची अखंडता टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करु” असेही ‘अॅस्ट्राझेनेका’च्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.
डिसेंबरपर्यंत कोट्यवधी डोसची निर्मिती होईल. भारतामध्ये डिसेंबरमध्ये या लसीची परवाना प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर डिसेंबरमध्ये लस बाजारात उपलब्ध होणार असल्याचं सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉक्टर संजीव ढेरे यांनी सांगितलं. (AstraZeneca puts leading COVID19 vaccine trial on hold)