पुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या
पर्यटनासाठी आलेल्या विदेशी नागरिकांना काही पुण्यातील तरुणांनी धक्काबुक्की करुन त्यांच्या कारच्या काचा फोडल्याचा संतापजनक प्रकार पुण्यात घडला. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात ही घटना घडली.
पुणे : “अतिथि देवो भवः” ही भारताची संस्कृती. आपल्याकडे येणारा प्रत्येक पाहुणा हा देवासारखा असतो, त्याला आपण मान देतो, त्याचं आदरातिथ्य करतो. मात्र, आपल्या याच संस्कृतीला गालबोट लावणारी घटना पुण्यात घडली. पर्यटनासाठी आलेल्या विदेशी नागरिकांना काही पुण्यातील तरुणांनी धक्काबुक्की करुन त्यांच्या कारच्या काचा फोडल्याचा संतापजनक प्रकार पुण्यात घडला. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात ही घटना घडली.
काही परदेशी नागरिक एका किराणा दुकानात खरेदी करण्यासाठी आले होते. त्यावेळी यांच्यातील दोन इराणी पर्यटकांना स्थानिक तरुणांनी धक्काबुक्की करून त्यांच्या गाडीची तोडफोड केली. याप्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मोहम्मद हुसैन (वय 27) आणि मोहम्मद अबाद (वय 28) असे धक्काबुक्की झालेल्या इराणी पर्यटकांची नावे आहेत.
हुसैन आणि अबाद हे दोघे मुंबई येथून एका टुरिस्ट कंपनीमार्फत कारचालकासह पुण्यामध्ये पर्यटनासाठी आले होते. माणिकबाग परिसरात आल्यानंतर कार चालक आणि त्यांच्यासोबत आलेला गाईड खरेदी करण्यासाठी किराणा दुकानात गेले. त्यावेळी चालक आणि दुकानदार यांच्यात वाद सुरु झाला. हा वाद सुरु होता त्यावेळी हुसैन आणि अबाद हे दोघेही गाडीमध्ये होते. त्यांचा वाद सुरु असताना दोघे पर्य़टक स्वत: गाडी चालवत तेथून निघून गेले. दरम्यान, किराणा दुकानात असलेल्या तरुणांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच, त्यांच्या कारच्या काचाही फोडल्या. दरम्यान, दुकानदाराबरोबर वाद घालणारे चालक आणि गाईड हे दोघे तेथून पसार झाले.
पर्यटकांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पर्यटकांना तीन दिवसांनी मायदेशी परत जायचे असल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
संबंधित बातम्या :
भावाची हत्या, कापलेले शीर घेऊन भाऊ पोलीस ठाण्यात
ब्लॅक पँथरचा डीपी, चिठ्ठीत द एण्ड, पुण्यात मोबाईल गेममुळे तरुणाची आत्महत्या
महिलेने अगोदर पोटच्या चिमुकल्यांना संपवलं, नंतर स्वतः गळफास घेतला
जमिनीच्या वादातून गोळीबार, 9 जणांचा मृत्यू, 25 जखमी
VIDEO :