हम बहुत छोटे लोग, हेलिकॉप्टरसे आते नही, 79 व्या वर्षी कोश्यारींनी पायीच शिवनेरी केला सर
वयाच्या 79 व्या वर्षी पायी किल्ला सर करत आपण किती फिट आहोत, हेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दाखवून दिलं.
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पायी शिवनेरी किल्ला सर केला. शिवनेरीला भेट देत राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊचं दर्शन घेतलं. शिवनेरी किल्ला चालत सर करणारे कोश्यारी हे महाराष्ट्राचे पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. (Governor Bhagat Singh Koshyari at Fort Shivneri)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवनेरी किल्ला सर करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आतापर्यंत कुठलेही राज्यपाल किल्ले शिवनेरीवर पायी आलेले नव्हते. मात्र रविवारी शिवनेरी चालत सर करुन कोश्यारींनी आपली इच्छा तर पूर्ण केलीच, पण पायी किल्ला गाठणारे पहिले राज्यपाल ठरण्याचा मानही पटकावला.
वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी पायी किल्ला सर करत आपण किती फिट आहोत, हेही दाखवून दिलं. कोश्यारी यांचा स्टॅमिना पाहून अधिकारीवर्गही अवाक झाला.
‘यहाँ आकर अच्छा लगा. हम बहुत छोटे लोग है, हेलिकॉप्टरसे आते नही. शिवाजी महाराज इस किले पर पैदल आते थे, हम भी पैदल आहे है. ये पहाडी तो हमारे लिए कुछ भी नही है’ असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले.
हेही वाचा : आपके राज्य में बिना आपके परमिशन आ गये, राज्यपालांचा अजितदादांना मिश्कील टोला
खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही ट्वीट करत राज्यपाल कोश्यारी यांचे कौतुक केले. तसेच प्रत्येक मंत्र्यांनी एक-एक किल्ला दत्तक घ्यावा याकोश्यारींनी केलेल्या आवाहनाचे संभाजीराजेंनी स्वागतही केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुणे दौऱ्यावर आहेत. स्वातंत्र्यदिनी पुणे जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. (Governor Bhagat Singh Koshyari at Fort Shivneri)
राज्यपालांनी वयाच्या 79 वर्षी किल्ले शिवनेरी ‘पायी’ सर केला. ही आमच्या सारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी समाधान देणारी गोष्ट आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांनी जे प्रत्येक मंत्र्याने एकेक किल्ला दत्तक घेण्याचे आवाहन केले त्याचे मी मनापासून स्वागत करतो. pic.twitter.com/76hkxSAlPp
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 16, 2020
“कोणी कसं यावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. माझी श्रद्धा होती म्हणून मी पायी आलो. शिवनेरीवर येण्यापूर्वी अनेकांनी मला तिथे पाऊस आहे. चिखल आहे. शिडी चढून जावे लागेल असे म्हणून घाबरवले होते. परंतु शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या भाग्याचा क्षण आहे” अशा भावना भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केल्या.
” छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्तिमत्त्व नव्हते, तर ते अवतारी पुरुष होते. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. ते खरे पूजनीय आदर्श आहेत. शिवजन्मस्थळी आल्यावर महाराजांच्या आयुष्यातील कर्तृत्व प्रवासाकडे ध्यान जाते. यापुढील काळात राम, कृष्ण, गुरु गोविंदसिंग, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत, जेणे करून जग आपल्या देशाकडे तिरक्या नजरेने पाहू शकणार नाही” असेही राज्यपाल म्हणाले. (Governor Bhagat Singh Koshyari at Fort Shivneri)