‘या’ मतदारसंघात दादागिरी चालणार नाही, पोलीस आपल्यासोबत : प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीवरही जोरदार टीका केली.
पुणे: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीवरही जोरदार टीका केली. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on Ajit Pawar) म्हणाले, “पिंपरी चिंचवड मतदारसंघात एक दादागिरी चालते. तशी दादागिरी केंद्रात देखील चालते. मात्र आता पोलीस आपल्यासोबत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात दादागिरी चालणार नाही.” यातून आंबेडकरांनी अजित पवार यांच्यावर (Prakash Ambedkar on Ajit Pawar) निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. ते पिंपरी चिंचवड येथे प्रचारसभेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. आंबेडकर म्हणाले, “निवडणुकीत यश येत नाही, तेव्हा मोदी बॉम्बस्फोट होण्याची शक्यता आहे, देशाला धोका आहे, असं सांगतात. मात्र, आपल्याकडे पोलीस आहेत. असा धोका असेल तर तो शोधून काढला पाहिजे. मात्र, तसे होत नाही. केवळ निवडणूक आली की देशाला धोका होतो आणि निवडणूक संपली की धोका जातो. निवडणूक आली की लोकांना भावनात्मक करायचं आणि मत मिळवायची. त्यातून सत्ता मिळवायची असंच काम सुरू आहे.” मध्यम वर्गीय नागरिकांनी खोट्या राष्ट्रवादाला बळी पडू नये, असंही आवाहन आंबेडकरांनी केलं.
सोलापूर, लातूर भागात दुष्काळ पडतो. मात्र, तेथे छावण्या होत नाहीत. ज्या छावण्या झाल्या त्या अगदी पावसाळ्यात सुरू झाल्या, असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये पूर परिस्थिती होती. या सरकारने काहीच मदत केली नाही. उलट लोकांनी एकमेकांना मदत केली. मुख्यमंत्री विमानाने येऊन घिरट्या घालून परत गेले, तर त्यांचा दुसरा मंत्री सेल्फी काढत होता, असंही आंबेडकर म्हणाले.
“2 बँका बुडाल्या, अजून 5 बँका बुडणार”
प्रकाश आंबडेकरांनी बँकाच्या स्थितीवरही भाष्य केलं. आता तर 2 बँका बदलल्या आहेत, अजून 5 बँका बुडणार आहेत, असंही भाकीत आंबेडकरांनी केलं. ते म्हणाले, “आर्थिक संकटाबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा सल्ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन घेणार असल्याचं कळतं आहे. मात्र, ही आर्थिक मंदी नैसर्गिक नसून अनैसर्गिक आहे.”