कोरोना खबरदारी : सलून बंद ते देऊळ बंद, पुण्यात काय काय बंद?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये 1 लाख 17 हजार 686 नागरिकांनाची 'कोरोना' तपासणी पूर्ण करण्यात आली. Pune District Corona Updates
पुणे : फ्रान्स आणि नेदरलँड्सला फिरुन आलेल्या महिलेचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 वर पोहोचली आहे, तर राज्यातील कोरोनाग्रस्ताचा आकडा 42 वर गेला आहे. राज्यातील ‘कोरोना’चे सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्यामुळे वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे पुण्यात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. (Pune District Corona Updates)
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये शोध मोहीम घेण्यात आली असून यामध्ये 1 लाख 17 हजार 686 नागरिकांनाची तपासणी पूर्ण करण्यात आली. कोरोनाचे पुण्यात 8, तर पिंपरी चिंचवडमध्ये 10 रुग्ण आहेत. या 18 पैकी 10 रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत.
पुणे महापालिका सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहे. महापौर आणि आयुक्तांना गरज असेल तर भेटायला या, अन्यथा पालिकेत गर्दी करु नका, आवश्यक कामं असतील तर पालिकेत या, अन्यथा फोन किंवा ईमेलच्या माध्यमातून संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ‘पीएमपीएमएल’ बसच्या 584 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. गर्दीतून होणारा संसर्ग रोखण्यासाठी हा उपाय योजण्यात आला आहे.
VIDEO : ‘800 पैकी फक्त 42 लोकांच्या टेस्ट पॉझिटिव्ह’ : आरोग्यमंत्री राजेश टोपे https://t.co/OKFjbSiGni
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 18, 2020
पुणे शहरातील थ्री स्टार, फोर स्टार आणि फाईव्ह स्टार हॉटेलच्या सोयीसुविधा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटेल पूर्ण बंद न ठेवता रेस्टॉरंट आणि कॉफी शॉप सुरु राहणार आहेत. रुम भाड्याने देणे सुरु आहे, तर बँक्वेट आणि सेमिनार पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तीन दिवस याची अंमलबजावणी होईल.
पुणे हॉटेलिअर असोसिएशनने हा निर्णय घेतला असून संघटनेत 70 सदस्यांचा सहभाग आहे. या हॉटेलमध्ये साधारण सहा हजार कर्मचारी काम करतात. पुण्यात पुढील तीन दिवस सलूनही बंद राहणार आहेत.
फळे-भाजीपाला आणि कांदा – बटाटा बाजार कोरोना वायरस संकटामुळे शुक्रवार 20 मार्च आणि शनिवार दिनांक 21 मार्च या दोन दिवशी संपूर्णपणे बंद राहणार आहे. 31 मार्च 2020 पर्यंत बुधवारी आणि शनिवारी संपूर्ण बाजार स्वच्छतेसाठी बंद राहणार आहे
पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, कसबा गणपती आदी देवस्थानही बंद ठेवण्यात येत आहेत. भक्तांनी देवळात गर्दी करु नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. (Pune District Corona Updates)