मनसेच्या ‘राजगर्जना बाईक रॅली’ला पोलिसांनी परवानगी नाकारली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पुण्यात शनिवारी (8 जानेवारी) काढण्यात येणाऱ्या राजगर्जना बाईक रॅलीला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे (MNS Bike rally in Pune).
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पुण्यात शनिवारी (8 जानेवारी) काढण्यात येणाऱ्या राजगर्जना बाईक रॅलीला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे (MNS Bike rally in Pune). त्यामुळे मनसेची बाईक रॅली होणार की नाही हे पाहावं लागणार आहे. असं असलं तरी मनसेचे पदाधिकारी बाईक रॅलीवर ठाम आहेत. पोलिसांनी परवानगी न दिल्यास ठरलेल्या वेळेत विनापरवानगी बाईक रॅली काढण्याची भूमिका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे मनसे आणि पुणे पोलीस यांच्यात संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली रॅली मुस्लिमबहुल भागातून जात असल्यामुळे परवानगी नाकारल्याचा आरोप पोलिसांवर केला आहे. या बाईक रॅलीत मनसेचे 5 हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी आयत्यावेळी परवानगी नाकारल्याचाही आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे बाईक रॅलीआधी मनसे कार्यकर्ते आणि पुणे पोलिसांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मनसेकडून 9 फेब्रुवारीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कथित बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावण्याची मागणी होत आहे. यासाठीच ही बाईक रॅली असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं. मनसेच्या मुंबईतील मोर्चाचा मार्गही ठरला आहे. मुंबईतील मोर्चा गिरगाव चौपाटीपासून निघेल. याआधी मोर्चाचा मार्ग मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून (भायखळा) आझाद मैदानापर्यंत ठरवण्यात आला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी भायखळ्यातून मोर्चा काढण्यास नकार दिल्याने हा बदल केल्याचं सांगण्यात येत आहे.
राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या ऐतिहासिक अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) विरोध करणाऱ्यांच्या मोर्चाला मोर्चानं उत्तर देण्याची भाषा केली होती. त्यासाठी 9 फेब्रुवारीला आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचीही घोषणा राज ठाकरेंनी केली. विशेष म्हणजे सुरुवातीला हा मोर्चा सीएएला समर्थन करण्यासाठी असल्याचं बोललं गेलं. त्यामुळे सीएए आणि एनआरसीला पाठिंबा देण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्यांमध्येही गोंधळ होता. त्यानंतर राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या शंकांचं निरसन केलं आणि आपली भूमिका स्पष्ट केली होती.
MNS Bike rally in Pune
संबंधित बातमी :
स्पेशल रिपोर्ट : मनसेच्या मोर्चाला भाजपची साथ? आशिष शेलार कृष्णकुंजवर
मनसेच्या 9 फेब्रुवारीच्या मोर्चाचा नवा मार्ग!
स्पेशल रिपोर्ट | मोर्चाआधीच मनसेची जोरदार ‘मोर्चेबांधणी’
VIDEO : मनसेच्या महामोर्चाचा टिझर रिलीज
संबंधित व्हिडीओ: