Pune Wall Collapse : मृतांच्या नातेवाईकांना 9 लाख, मृतदेह विमानाने बिहारला पाठवणार
पुण्यातील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय मृत्यू झालेल्या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 9 लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पुणे : पुण्यातील कोंढवा भागात मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 मजुर तर तीन मुलांचा समावेश आहे. कोंढव्यातील तालाब मशीदीजवळील कंपनीसमोर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय मृत्यू झालेल्या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत सरकारने जाहीर केली आहे.
दरम्यान आज (29 जून) मध्यरात्रीच्या दीड दोनच्या सुमारास सर्व मजुर झोपेत असल्याने त्यांच्यावर काळाने घाला घातला. भिंत कोसळल्यानंतर मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं आणि अडकलेल्या काहींना वाचवलं. त्यानंतर त्यातील काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या मजुरांना राहण्यासाठी पत्र्याचे शेड उभे केले होते. या शेडवर इमारतीची भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी एक विशेष समिती नेमली आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
पुणे दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना मिळणारी एकूण मदत
- एनडीआरएम ( नॅशनल डिझास्टर रेस्क्यू मॅनेजमेंट ) प्रत्येकी 4 लाख रुपये
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी – प्रत्येक 5 लाख रुपये
- मृतांच्या नातेवाईकांना मिळणारी एकूण मदत प्रत्येकी 9 लाख रुपये
तसेच या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी मृतांना कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केली. बांधकाम मजूर राहत असलेल्या कच्च्या झोपडीवर रात्री दीडच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
त्याशिवाय मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख आणि जखमींना 25 हजार रुपयांची मदतही जाहीर केली आहे. तसेच त्या मजुरांचे मृतदेह विमानाने त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
दरम्यान नुकतंच यातील दोन बिल्डरांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर पुणे पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. तसेच उद्या दुपारी 2 च्या नंतर मजुरांचे मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयातून विमानाने त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्या :