मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत
शिक्रापूरमधील शेख कुटुंबीयांनी मुलीच्या जन्माचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं आहे. आईसह मुलगी घरी आल्यानंतर फटाक्यांची आताषबाजी, पेढे वाटप करण्यात आले. Shaikh family of Shikrapur welcomes baby girl with showering flowers
पुणे : शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील मुस्लीम समाजातील शेख कुटुंबीयांनं मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. आईसह मुलगी घरी आल्यानंतर फटाक्यांची आताषबाजी, पेढे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शेख कुटुंबीयांनी मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करून समाजाला ‘लेक वाचवा’ ‘मुलगी वाचवा’ तसेच ‘बेटी धन की पेटी’ असा अनोखा आणि आगळावेगळा संदेश दिला आहे. (Shaikh family of Shikrapur welcomes baby girl with showering flowers)
शेरखान शेख व नसीम शेख या दाम्पत्यांने मुलीला जन्म दिला, मुलीचा जन्म झाल्याचे समजताच शेख कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी शेख कुटुंबीयांनी फटाके वाजवले, पेढे वाटून आंदोत्सव साजरा केला. इतकेच नव्हे तर मुलीचे चुलते समीर शेख यांनी आपल्या नवजात पुतणीच्या वापरासाठी लागणारी भांडी चांदीची आणली.
मुलीला हॉस्पिटलमधून घरी आणताना मुलीचे चुलते समीर शेख व आमीर शेख यांसह सर्व शेख कुटुंबीयांनी फुलांची गाडी सजवून आणि रस्त्याने फटाके वाजवून फुलांची उधळण करत रस्त्यावर फुलांच्या पायघड्या घालून मुलीला घरात आणले. तर, मुलीच्या चुलती सलमा शेख, आर्शिया शेख, मावशी निलोफर अन्सारी, आत्या आरजू शेख व आदींनी घरामध्ये फुलांची, फुग्यांची सजावट करून मुलीला घरात आणल्यानंतर एकमेकांना पेढे चारून आनंदोत्सव साजरा केला.
आमच्या कुटुंबात मुलगी झाल्यामुळं आनंदाचे वातावरण आहे. समाजानं मुलींच्या जन्मानंतर आनंदोत्सव साजरा केला पाहिजे, असं मुलीचे वडील शेरखान शेख यांनी सांगितले.
मुलीच्या जन्माने आमच्या कुटुंबाचं स्वप्न साकार झालं असून आमच्या घरात मुलगी जन्माला आल्याचे समजल्यानंतर आम्ही आमच्या नातीचे स्वागत केले. मुलगी होऊन देखील पेढेच वाटले अशाच प्रकारे समाजाने मुलीचा स्वीकार करून मुलीच्या जन्माचे स्वागत करावे, असे मुलीचे आजोबा सिकंदर शेख आणि आजी जरीना शेख यांनी म्हटले.
मुलीला घरी आणताना शेख कुटुंबीयांनी मुलीचे केलेले स्वागत पाहून परिसरातील नागरिक देखील आश्चर्यचकित झाले होते. शेख कुटुंबीयांनी मुलीच्या जन्माचा साजरा केलेला आनंदोत्सव पाहून शिक्रापूर येथील अष्टविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. शरद लांडगे यांनी हॉस्पिटलचे बिल देखील अगदी नाममात्र स्वरुपात घेऊन शेख कुटुंबीयांच्या आनंदात भर टाकली.
समाजाने शेख कुटुंबियांचा आदर्श घ्यावा.तसेच शिक्रापूर येथे हॉस्पिटल मधून रुग्णांना सेवा देत असताना अनेकदा मुलगी जन्माला आली म्हणून पालक नाराजी व्यक्त व्यक्त करण्यापेक्षा मुलगी झाल्यानंतर पालकांनी आनंदोत्सव साजरा करावा, अशी अपेक्षा डॉ.शरद लांडगेंनी व्यक्त केली.
मुलगी जन्माला आल्यानंतर समाजामध्ये एक प्रकारे नाराजी व्यक्त केली जाते. काही वेळा मुलगी नको म्हणून गर्भपात देखील केला जातो. मात्र, शेख कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा करून समाजापुढं आदर्श ठेवला आहे.
महत्वाच्या बातम्या :
सिंचन घोटाळ्याची ईडीकडून चौकशी; अजितदादा म्हणाले…
दिवाळीपर्यंत आम्ही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणार नाही : अजित पवार
(Shaikh family of Shikrapur welcomes baby girl with showering flowers)