पुण्यातल्या चार मतदारसंघात शिवसैनिकांची बंडखोरी
पुण्यातल्या कसबा, खडकवासला, वडगाव शेरी आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून चार शिवसैनिकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतरही हे अर्ज मागे न घेतले गेल्यास पुण्यात युतीची अडचण अटळ मानली जात आहे.
पुणे : शिवसेनेला विधानसभेसाठी पुण्यातील आठपैकी एकही जागा न मिळाल्याने शिवसैनिक (Shivsena Rebels Pune) कमालीचे अस्वस्थ आहेत. शिवसैनिकांनी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी बंडाचं (Shivsena Rebels Pune) निशाण फडकावलंय. पुण्यातल्या कसबा, खडकवासला, वडगाव शेरी आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून चार शिवसैनिकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतरही हे अर्ज मागे न घेतले गेल्यास पुण्यात युतीची अडचण अटळ मानली जात आहे.
पुण्यातल्या आठ मतदारसंघापैकी दोन मतदारसंघाची मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत होती. जागवाटपात शिवसेनेच्या पदरात काहीच पडलं नाही. त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. शहरप्रमुखांनी मातोश्री गाठली. तरी त्याचा उपयोग झाला नाही. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी कसबा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्या विरोधात अर्ज दाखल केलाय. प्रश्न शिवसेनेच्या अस्तित्वाचा आहे, त्यामुळे काही झालं तरी माघार घेणार नाही, असा पवित्रा धनवडे यांनी घेतला आहे.
विशाल धनवडे यांच्या पाठोपाठ जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनीही बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलाय. खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अलका चौकात आपल्या समर्थकांसह त्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर शिवसेना भवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.
एकूणच शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप आणि चीड आहे. पण शहरप्रमुखांना कोणी बंडखोरी करत अर्ज भरलेत याबद्दल माहिती नाही. उमेदवारी अर्ज भरायला अजूनही वेळ आहे, शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. आम्हाला एक जागा नक्की मिळेल, हा विश्वास व्यक्त शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिवसैनिकांनी बंडाचा झेंडा फडकावला असला तरी राजकीय घडामोडीनंतर त्यांचं बंड थंड होईल, असं मत राजकीय विश्लेषक महेंद्र बडदे यांनी व्यक्त केलंय.
कायम आदेशावर चालणाऱ्या शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्नच पुण्यात निर्माण झाला आहे. फक्त पक्षाचं नाही तर स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान शिवसैनिकांपुढे आहे. त्याचसाठी शिवसेनेच्या एक नव्हे तर चार जणांनी बंडखोरी केली आहे. आता ‘मातोश्री’च्या आदेशानंतर हे बंड थंड होईल, की शिवसैनिक आदेश झुगारुन लावतील हे 7 तारखेला स्पष्ट होईल.