दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतंच दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं (SSC HSC Timetable 2020) आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतंच दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं (SSC HSC Timetable 2020) आहे. त्यानुसार इयत्ता दहावीच्या परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च 2020 दरम्यान घेण्यात येणार आहे. तर इयत्ता बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 या कालावधीत घेण्यात येणार आहे.
येत्या 18 फेब्रुवारी 2020 पासून बारावीच्या लेखी परीक्षांना सुरुवात होईल. तर 3 मार्च 2020 पासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात होईल. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय शिक्षण मंडळांतर्गत या परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा, तोंडी व अन्य परीक्षांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळांना कळवण्यात येणार (SSC HSC Timetable 2020) आहे.
दहावी बारावीच्या सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहाता येणार आहे. www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आज (15 ऑक्टोबर) पासून वेळापत्रक उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे यासाठी परीक्षांची तारीख लवकर जाहीर करणार असा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2020 च्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
शाळा आणि महाविद्यालयांना संपूर्ण वेळापत्रक लवकरच पाठवण्यात येईल असेही मंडळाकडून सांगण्यात आले आहे. तसेच सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही माध्यमातून जाहीर झालेलं वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहनही मंडळाने केले आहे.
वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे किंवा राज्य मंडळाकडे 15 दिवसांच्या आत लेखी स्वरुपात पाठवाव्यात असे आवाहन मंडळाने केले आहे.