Raksha Bandhan 2023: 200 वर्षानंतर रक्षाबंधन या दिवशी ग्रहांचा अद्भुत मेळा, शुभ योगामुळे तीन राशींसाठी ‘अच्छे दिन’
Horoscope 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती खूपच महत्वाची असते. ग्रहांच्या स्थितीवरून भाकीत वर्तवलं जातं. कोणता ग्रह कोणत्या स्थानात विराजमान यावर बरंच काही अवलंबून असतं.
मुंबई : हिंदू धर्मात रक्षाबंधन सणाचं विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. मात्र या वर्षी अधिक श्रावणासोबत पौर्णिमा तिथी दोन दिवस असणार आहे. 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट असे दोन दिवस पौर्णिमा तिथी पडली आहे. असं असताना या दिवशी ग्रहांची स्थितीही वेगळी असणार आहे. कारण ग्रहांची अशी स्थिती 200 वर्षानंतर घडून आली आहे. शनि आणि गुरु हे दोन्ही महत्त्वाचे ग्रह आपल्या स्वराशीत विराजमान आहे. गुरु मेष राशीत वक्री, तर शनि कुंभ राशीत वक्री असणार आहे. त्याचबरोबर 30 ऑगस्टला रात्री 8 वाजून 46 मिनिटांपर्यंत धनिष्ठा नक्षत्र असेल आणि त्यानंतर शतभिषा नक्षत्राला सुरुवात होईल. हे नक्षत्र 31 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांपर्यंत असेल. शनि शतभिषा नक्षत्राच्या पहिल्या चरणात विराजमान असेल.
दुसरीकडे, ग्रहांचा राजा सूर्यही स्वरास असलेल्या सिंह राशीत असेल. याच राशीत बुध ग्रह वक्री अवस्थेत असेल. त्यामुळे बुधादित्य योग जुळून येणार आहे. त्यामुळे ग्रहांची अशी तीन राशींच्या जातकांसाठी फलदायी ठरणार आहे. कसं ते समजून घ्या.
या तीन राशींना मिळणार लाभ
मेष : या राशीत गुरु ग्रह वक्री अवस्थेत असल्याने जातकांना त्याचा फायदा होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील. तसेच नवी कामं हाती पडतील. त्यामुळे उद्योगधंद्यात भरभराट दिसून येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना काही संधी चालून येतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वाहन किंवा संपत्ती खरेदीचा योग जुळून येईल.
सिंह : या राशीत सूर्य आणि बुधाची युती होत असून बुधादित्य योग तयार होत आहे. तसेच सूर्य मघा नक्षत्रात असणार आहे. त्यामुळे जातकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. देवी लक्ष्मीची कृपा राहील आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळताना दिसेल. अडकलेले पैसेही या काळात मिळू शकतात. आरोग्यविषयक तक्रारीही दूर होतील.
कुंभ : शनिची ही स्वरास असून यात राशीत शनि वक्री अवस्थेत आहे. त्यामुळे शनिची उत्तम साथ या काळात लाभेल. विदेशात जाण्याचा योग जुळून येईल. तसेच कामाच्या ठिकाणी आपला हुद्दा वाढेल. तसेच नवीन जबाबदाऱ्या पडतील. विविध मार्गातून पैसे येतील अशी स्थिती आहे. वैवाहिक जीवनात काही कारणास्तव वाद होऊ शकतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)