Panchak 2023 : 15 एप्रिलपासून पुढचे पाच दिवस ‘अशुभ पंचक’, अशी काम चुकूनही करू नका
Panchak 2023 : हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात पंचक असते. पंचक हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. पंचक पाच दिवसांसाठी असते. या काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही.
मुंबई – हिंदू धर्मात कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहिला जातो. मुहूर्ताचा विचार ग्रह नक्षत्रांच्या स्थितीवर आधारावर केला जातो. त्यानंतर शुभ की अशुभ स्थिती ठरवली जाते. ज्योतिष शास्त्रात काही नक्षत्र आणि ग्रहांच्या स्थितीमुळे पंचक लागतं. या काळात शुभ कार्य करण्यास मनाई असते. धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती अशी पाच नक्षत्रांचा समूह आहे. धनिष्ठापासून सुरु होत रेवती नक्षत्रापर्यंतच्या कालावधीला पंचक संबोधलं जातं. रोग पंचक, राज पंचक, अग्नि पंचक, मृत्यू पंचक आणि चोर पंचक असे पाच पंचक आहेत.
किती प्रकारचे पंचक असतात?
रविवारपासून सुरु होणाऱ्या पंचकाला रोग पंचक, सोमवारपासून सुरु होणाऱ्या पंचकाला राज पंचक, मंगळवारपासून सुरु होणाऱ्या पंचकाला अग्नि पंचक, शनिवारपासून सुरु होणाऱ्या पंचकाला मृत्यू पंचक आणि शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या पंचकाला चोर पंचक संबोधलं जातं. यापैकी राज पंचक शुभ गणलं जातं आणि इतर पंचक अशुभ असतात.
पंचक कालावधीबाबत जाणून घ्या
पंचांगानुसार 15 एप्रिल 2023 पासून पंचक सुरु होत आहे. या दिवशी शनिवार असल्याने मृत्यू पंचक लागणार आहे. हे सर्वात अशुभ पंचक मानलं जातं. या काळात कोणतंही जोखीमेचं काम करू नये. यामुळे वाद, दुखापत किंवा दुर्घटना होण्याची शक्यता असते. पंचांगानुसार 15 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 44 मिनिटांनी पंचक सुरु होते. हे पंचक 19 एप्रिल 2023 रोजी रात्री 11 वाजून 53 मिनिटांपर्यंत असणार आहे.
पंचक कालावधीत मृत्यू होणं अशुभ मानलं जातं. जर कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबावर संकट ओढावतं. यासाठी मृत व्यक्तीच्या अंतिम संस्कारावेळी कुशाचा एक पुतळा बनवून मृत व्यक्तीसोबत अंत्यसंस्कार करण्याची प्रथा आहे.
मृत्यू पंचकात ही कामं करू नये
- पंचकादरम्यान लाकडं जमा करणे किंवा खरेदी करू नयेत. पलंग बनवू नये.
- घरावरचं छत तयार करू नये, यामुळे धन हानी आणि घरात वाद होतात.
- या कालावधीत नवीन कामाची सुरुवात करू नये. त्यामुळे अशुभ फळं मिळतात अशी मान्यता आहे.
- पंचका दरम्यान अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे लांबचा प्रवास करणं टाळलं पाहीजे. अपघातात मृत्यू होण्याची शक्यता असते.
- पंचक काळात दक्षिणेकडे प्रवास करू नये. दक्षिण दिशा यमाची दिशा मानली गेली आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)