Astrology 2023 : 12 वर्षानंतर गुरुमुळे तयार होणार ‘विपरीत राजयोग’, तीन राशींवर होईल कृपा
Guru Vakri : राशीचक्रात गुरु ग्रहाचं महत्त्व आहे. ज्या राशीत गुरु चांगल्या स्थितीत असतो. त्या राशीच्या जातकांना आयुष्यात अनेक गोष्टी सहज मिळतात.
मुंबई : ज्योतिषशास्त्राचं गणित ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं. त्यामुळे ग्रह कोणत्या स्थानात बसला आणि काय फळं देतो यावर भाकीत केलं जातं. गुरु ग्रह 13 वर्षानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्यामुळे गुरु ज्या राशीत विराजमान असतो. त्या राशीत ग्रहांसोबत युती आघाड्या या होत असतात. त्यात काही शुभ तर काही अशुभ युती घडून येतात. गुरु ग्रह सध्या मेष राशीत विराजमान असून याच राशीत पापग्रह राहुही आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जातकांना अशुभ अशा चांडाळ योगाला सामोरं जावं लागत आहे.
गुरु ग्रह मेष राशीत वक्री होणार आहे. 4 सप्टेंबरपासून गुरु वक्री अवस्थेत जाणार आहे. त्यामुळे विपरीत राजयोग तयार होणार आहे. ही स्थिती 31 डिसेंबर 2023 पर्यंत असणार आहे. जवळपास 118 दिवस गुरु ग्रह वक्री अवस्थेत असणार आहेत.
तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ
मीन : गुरु ग्रह या राशीच्या धन स्थानात वक्री होणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. प्रगतीची नवीन दारं उघडी होतील. लॉटरी किंवा शेअर बाजारातून अचानक धनलाभ होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुरुचं चांगलं पाठबळ मिळेल. पण आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आपल्यामुळे कोण दुखावणार नाही याची काळजी घ्या. साडेसातीचा पहिला टप्पा सुरु असल्याने तब्येतीची काळजी घ्या.
सिंह : या राशीच्या भाग्य स्थानात गुरु ग्रह वक्री होणार आहे. विपरीत राजयोगामुळे नशिबाची चांगली साथ या राशीच्या जातकांना मिळेल. जमिनीचा व्यवहार या काळात निश्चित होईल. तसेच गेल्या काही दिवसांपासून अर्धवट राहिलेली कामंही पूर्ण होतील. घरात आनंदाचं वातावरण राहील. कौटुंबिक कलह दूर झाल्याने डोकंही शांत राहील. मुलांना नवीन काही शिकण्यासाठी प्रोत्साहित करा.
मिथुन : गुरु ग्रह या राशीच्या उत्पन्न स्थानात वक्री होणार आहे. यामुळे पगारवाढीसोबत इन्सेन्टिव्ह पदरी पडेल असं ग्रहमान आहे. उत्पन्नात वाढ झाल्याने कौटुंबिक वातावरणही चांगलं राहील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. दूरचा प्रवास शक्यतो टाळा. तसेच आरोग्यविषयक तक्रार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. उगाचच अंगावर आजारपण काढू नका.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)