Astrology 2023 : शुक्र ग्रह 9 दिवसानंतर असणार वक्री अवस्थेत, तीन राशींना बसणार असा फटका
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाचं महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे. शुक्रामुळे जातकाला भौतिक सुखांचा लाभ मिळतो. त्यामुळे शुक्राची स्थितीकडे लक्ष लागून असतं.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती खूपच महत्त्वाची असते. त्यात पाप ग्रह आणि शुभ ग्रह अशी वर्गवारी देखील करण्यात आली आहे. शुक्र हा शुभ ग्रह असून त्याची स्थिती गोचर कुंडलीत खूपच महत्त्वाची ठरते. शुक्र हा ग्रह वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे. त्याचबरोबर सौंदर्य, आकर्षण आणि भौतिक सुखांचा कारक ग्रह आहे. सध्या शुक्र ग्रह सिंह राशीत विराजमान आहे. पण 9 दिवसांनी म्हणजेच 23 जुलै शुक्र ग्रह वक्री होणार आहे. 23 जुलैला सकाळी 6 वाजून 1 मिनिटानी शुक्र ग्रह वक्री अवस्थेत जाईल. त्यानंतर अशाच स्थितीत 7 ऑगस्टला चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश करेल. त्यामुळे काही राशींच्या जातकांना फटका बसणार आहे.
या तीन राशीच्या जातकांना बसेल फटका
वृषभ : शुक्र हा राशीचा स्वामी ग्रह आहे. पण वक्री स्थितीचा या राशीच्या जातकांना फटका बसेल. कारण शुक्र हा चौथ्या स्थानात वक्री होणार आहे. जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी दबाव वाढू शकतो. होणारी कामंही या काळात रखडल्याने चिंता वाढेल. शक्यतो या काळात गुंतवणूक न केलेलीच बरी राहील. कारण आर्थिक फटका या काळात बसू शकतो. तसेच आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढतील.
कर्क : शुक्र ग्रह या राशीच्या दुसऱ्या स्थानात वक्री होत आहे. म्हणजेच धनस्थानात शुक्राची अशी स्थिती असणार आहे. त्यामुळे आर्थिक फटका या काळात बसेल. विनाकारण काही गोष्टींवर पैसा खर्च होईल. कौटुंबिक पातळीवर वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्याकडून एखादी चूक घडू शकते. ही चूक तुम्हाला चांगली महागात पडू शकते. त्यामुळे या काळात काम करताना काळजी घ्या.
कन्या : शुक्र ग्रह या राशीच्या बाराव्या स्थानात म्हणजेच व्यय स्थानात वक्री होणार आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण राहणार नाही. घरातील व्यक्ती आजारी पडल्याने खर्च करावा लागेल. सेव्हिंगवर वाईट परिणाम दिसेल. दुसरीकडे कौटुंबिक कलहाला सामोरं जावं लागेल. विनाकारण वाद घालू नका. शक्य असल्यास दैवी उपासना करा किंवा कुलस्वामिनीचं नामस्मरण करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)