Shukra Uday 2023: भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र ग्रह सूर्यापासून गेला लांब, स्वप्रभावामुळे चार राशींना मिळणार साथ
Shukra Uday 2023: ग्रहमंडळात शुक्र एक महत्त्वाचा ग्रहांपैकी एक आहे. शुक्राच्या स्थितीमुळे मानवी जीवनातील भौतिक सुखांवर परिणाम होतो. चला जाणून घेऊयात शुक्र उदयाचा कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होणार ते..
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहमंडळातील शुक्र हा महत्त्वाच्या ग्रहांपैकी एक आहे. भौतिक सुख, प्रेम प्रकरणात शुक्र ग्रहाची महत्त्वाची ठरते. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह 18 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजून 17 मिनिटांना कर्क राशीत उदीत झाला आहे. एखादा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ आला की त्याचं तेज गमावतो. पण सूर्याने कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करताना शुक्राला पुन्हा एकदा तेज प्राप्त झालं आहे. यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे. पण भौतिक सुख, आनंद आणि वैवाहिक जीवनात चार राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळणार ते..
या चार राशींना मिळणार लाभ
मेष : शुक्र ग्रह या राशीच्या दशम स्थानात विराजमान आहे. या स्थानातच उदीत झाल्याने गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अडचणी दूर होतील. संपत्ती तसेच वाहन खरेदीचा योग जुळून येईल. जोडीदारासोबत प्रेमपूर्ण संबंध राहतील. करिअरमध्ये काही सकारात्मक घडामोडी घडतील. त्याचा तु्म्हाला भविष्यात फायदा होईल.
कर्क : शुक्र ग्रह या राशीतच म्हणजेच लग्न भावात उदीत होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांचा आत्मविश्वास जबरदस्त दुणावलेला राहील. चेहऱ्यावरचं तेज बरंच काही सांगून जाईल. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित कराल. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवाल. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती मिळू शकते.
कन्या : या राशीच्या जातकांना शुक्र उदय लाभदायी ठरणार आहे. कारण या राशीच्या एकादश भावात शुक्र उदय होणार आहे. त्यामुळे जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच मित्रांची उत्तम साथ लाभेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून मोलाची मदत होईल. त्यामुळे कामाचा पसारा झटपट आटपण्यात मदत होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील.
कुंभ : या राशीच्या षष्टम भावात शुक्र उदय होतो. यामुळे जातकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. पण आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संपत्ती किंवा वाहन खरेदीचं स्वप्न पूर्ण होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करा. तसेच गरज पडली तर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. वाद होईल असं वागू नका.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)