Astrology 2023 : शनि राहुच्या स्थितीमुळे अशुभ योग, चार महिने 5 राशींसाठी ठरणार डोकदुखी
ग्रह राशी भ्रमणासोबत नक्षत्र गोचरही करत असतात. त्यामुळे राशींसोबत 27 नक्षत्रांमध्येही उलथापालथ होत असते. त्याचा थेट परिणाम राशीचक्रावर दिसून येतो.
मुंबई : कुंडलीमध्ये शनि, राहु-केतुची अशुभ स्थिती सहन होणारी नसते. त्यामुळे या ग्रहांच्या स्थिती आणि त्यांच्या फळाबाबत जाणून घेण्यासाठी जातक उत्सुक असतात. जर हे ग्रह खराब स्थितीत असतील तर मात्र ज्योतिषीय उपाय करून तात्पुरता दिलासा मिळवला जातो. न्यायदेवात शनिदेव सध्या शतभिषा नक्षत्रात गोचर करत आहेत. यामुळे शनि आणि राहुची युती तयार होणार आहे. त्यामुळे 17 ऑक्टोबर 2023 पर्यंत राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. खासकरून पाच राशीच्या जातकांना चार महिने त्रास सहन करावा लागणार आहे.
या राशीच्या जातकांना होणार त्रास
कर्क : या राशीचे जातक सध्या शनिच्या अडीचकीखाली आहेत. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात शतभिषा नक्षत्रात राहुसोबत युती होणार असल्याने अडचणीत वाढ होणार आहे. आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकते. खासगी नोकरी करणाऱ्या जातकांना जरा सांभाळूनच राहावं लागेल. तसेच गुंतवणूक करताना योग्य व्यक्तींचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
कन्या : शनि आणि राहुच्या युतीमुळे जातकांचा भ्रमनिरास होईल. काम होईल असं ठाम असताना अचानक नकारार्थी उत्तर मिळेल. त्यामुळे काय होत आहे हे कळणारच नाही. काही कामांसाठी कर्ज घेण्याची वेळ येईल. त्यामुळे विनाकारण पैसे खर्च करू नका. तसेच आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक : या राशीच्या जातकांवरही शनि राहुच्या युतीचा प्रभाव दिसून येईल. त्यामुळे चार महिन्यांचा कालावधी जरा जपून काढावा लागेल. जास्त आतातयीपणा करून चालणार नाही. काही कारणास्तव नोकरीच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. तसेच जागेबाबत भावकीचा वाद चिघळला दिसून येईल. या काळात वाहन जपून चालवणं गरजेचं आहे.
कुंभ : सध्या शनिदेव याच राशीत विराजमान आहे. म्हणजेच साडेसातीचा मधला टप्पा सुरु आहे. शनिदेवांकडे राशीचं स्वामित्व असलं तरी काही त्रास होऊ शकतात. वैयक्तिक आयुष्यात चढउतार दिसून येईल. जोडीदारासोबत विनाकारण वाद होतील. पण डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
मीन : या राशीला शनि साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यामुळे आधीच अडचणीत वाढ असताना राहु युतीची फळ भोगावी लागणार आहेत. पाय दुखीचा त्रास या काळात बळावू शकतो. तसेच घरचं बजेट पुरतं कोलमडून गेल्याचं दिसून येईल. त्यामुळे चार महिने आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)