Mangal Gochar 2023 : मंगळ ग्रहाची 52 दिवस राहील या राशींवर कृपा, लक्ष्मीयोगामुळे आर्थिक गणितं सुटतील झटपट
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह आपल्या स्वभावानुसार फळं देत असतो. त्यामुळे ग्रहांच्या गोचराला खूप महत्त्व आहे. आता मंगळ ग्रह मिथुन राशीत कर्क राशीत प्रवेश करणार आहे.
मुंबई : ग्रह, नक्षत्र आणि राशीचक्र यांचं एक नातं आहे. ग्रह नक्षत्रांची प्रत्येक स्थित राशीचक्रावर परिणाम करत असते. ग्रहांचा गोचर मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम करत असतो. ग्रहांचा सेनापती म्हणून ओळख असलेला मंगळ ग्रह आता गोचर करणार आहे. मंगळ ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. 10 मे 2023 रोजी मंगळ ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. या राशीत मंगळ ग्रह 1 जुलै 2023 पर्यंत राहणार आहे. यामुळे दोन वेळा लक्ष्मीयोग जुळून येणार आहे. या योगामुळे काही जातकांना फायदा होणार आहे.
मंगळ चंद्राची युती आणि लक्ष्मीयोग
मंगळ ग्रह 1 जुलैपर्यंत कर्क राशीत असणार आहे. यामुळे दोन वेळा चंद्रासोबत युती होणार आहे. हे दोन ग्रह एकत्र आले की लक्ष्मी योग तयार होतो. चंद्र गोचर करत 24 मे रोजी सकाळी 8 वाजून 27 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करेल. त्यामुळे 26 मे संध्याकाळी 8 वाजून 49 मिनिटांपर्यंत लक्ष्मीयोग असेल.
लक्ष्मीयोगाची दुसरी स्थिती 20 जून ते 23 जून दरम्यान असणार आहे. चंद्र 20 जून रोजी दुपारी 3 वाजून 58 मिनिटांनी कर्क राशीत येईल. त्यानंतर 23 जून रोजी सकाळी 4 वाजून 17 मिनिटांपर्यंत या राशीत राहील. यामुळे लक्ष्मीयोग घडून येणार आहे.
या राशीच्या जातकांना होणार फायदा
कर्क : या राशीतच मंगळ गोचर करणार आहे. त्यामुळे दोन वेळा लक्ष्मी योगाची स्थिती निर्माण होईल. यामुळे या काळात जातकांचा प्रचंड आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी बॉस आणि सहकाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते. वाहन खरेदीचा योग या काळात जुळून येईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.
कन्या : या राशीच्या एकादश भावात मंगळ स्थित असणार आहे. त्यात दोन वेळा लक्ष्मीयोग जुळून येईल. त्यामुळे जातकांच्या उत्पन्नात वाढ होईल. जमीन खरेदीचा योग जुळून येईल. पण प्रेम प्रकरणात काळजी घेणं गरजेचं आहे. कारण एखादं प्रकरण वादाला फोडणी देऊ शकते. वडिलांकडून आर्थिक मदत मिळेल. आत्मविश्वास चांगला राहील.
कुंभ : या राशीच्या सहाव्या स्थानात मंगळ गोचर करणार आहे. लक्ष्मी योग आणि शनि स्वराशीत असल्याने शत्रुपक्षावर विजय मिळेल. कारण हितशत्रूंना तुम्ही मंगळाच्या पाठबळाने दणका द्याल. न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला यश मिळेल. या काळात मित्रांबरोबर आर्थिक व्यवहार करू नका. नुकसान होऊ शकतं. विदेशात जाण्याचा योग जुळून येईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)