17 जून 2023 रोजी शनिदेव होणार वक्री, राशीचक्रातील 12 राशींवर असा होईल परिणाम जाणून घ्या
शनिदेव ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची प्रत्येक स्थिती बऱ्याच घडामोडी घडवून जाते. त्यामुळे शनिच्या स्थितीकडे ज्योतिष्यांचं बारीक लक्ष लागून असते. 17 जूनपासून शनिदेव वक्री होणार असून राशीचक्रावर काय परिणाम होईल जाणून घेऊयात..
मुंबई : शनिदेव हे नाव ऐकलं की भल्याभल्यांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण शनिदेव एकदा राशीला आले की कोणता हिशेब कसा चुकता करतील सांगता येत नाही. त्यामुळे शनि राशीला आले की घडामोडी घडायला सुरु होतात. शनिदेवांना ज्योतिषशास्त्रात पापग्रहाचा दर्जा आहे. पण ते न्यायदेवतेची भूमिका बजावतात. आपल्या कर्मानुसार ते फळं देतात. त्यामुळे जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं हे समजून चालणं गरजेचं आहे. सध्या शनिदेव कुंभ राशीत आहेत आणि 17 जून 2023 रोजी रात्री 10 वाजून 52 मिनिटांनी वक्री होणार आहेत. या स्थितीत शनिदे 4 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांपर्यं असतील.
राशीचक्रावर शनिच्या वक्री स्थितीचा परिणाम
मेष : या राशीच्या एकादश भावात शनिदेव वक्री होणार आहेत. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. पण कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती किंवा भावंडांशी वाद होतील. संतानसंबंधी चिंता राहील.
वृषभ : या राशीच्या दशम भावात शनिदेव वक्री होणार आहेत. कामाच्या अति ताणामुळे शारीरिक थकवा जाणवेल. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. काही योजना गुप्तपणे राबवण्याचा प्रयत्न करा. काही कामांसाठी वेळ लागू शकतो.
मिथुन : या राशीच्या नवव्या स्थानात शनि वक्री होतील. या काळात धर्म आणि अध्यात्मात रुचि वाढेल. तुमच्या कामाची आणि निर्णयाची प्रशंसा होईल. दान धर्म करून पुण्य पदरी पाडून घ्या.
कर्क : या राशीच्या अष्टम भावात शनि वक्री होणार आहे. त्यामुळे याचा प्रभाव चांगला नसेल. आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढू शकते. कामाच्या ठिकाणी हितशत्रूंकडून दगाफटका होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीत वाद आणखी वाढू शकतो.
सिंह : या राशीच्या सप्तम भावात शनि वक्री होणार आहे. विवाह जमण्यास विलंब होऊ शकतो. जोडीदाराच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. भागीदारीच्या व्यवसायापासून दूर राहाल. वाद होईल असं वागू नका. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा.
कन्या : या राशीच्या षष्टम भावात शनि वक्री होत आहेत. हा शत्रू भाव असल्याने चांगली फळं मिळतील. गुप्तशत्रू तुमच्या कामाने निपचीत पडतील. मोठ्या कामाची सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ आहे. काही त्रासदायक प्रवास करावे लागतील. या काळात आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.
तूळ : शनिदेव या राशीच्या पंचम स्थानात वक्री होत आहेत. त्यामुळे या काळात संमिश्र प्रतिसाद मिळेल. प्रेम प्रकरणात अडचण येऊ शकते. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. घरातील वरिष्ठ व्यक्तींशी मतभेद होतील.
वृश्चिक : या राशीच्या चतुर्थ स्थानात शनि वक्री असतील. मित्रांच्या बाबतीत काही अप्रिय घटना घडतील. या काळात प्रवास करताना काळजी घ्या. सामान चोरी होण्याची शक्यता आहे. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.
धनु : या राशीच्या तृतीय म्हणजेच पराक्रम भावात शनिदेव वक्री असतील. साहस आणि पराक्रमात या काळात वाढ होईल. तुमच्या प्रत्येक निर्णयाचं कौतुक होईल. कठीण परिस्थितीवर आरामात नियंत्रण मिळवाल. आध्यात्मिक विकास या काळात होईल.
मकर : या राशीच्या दुसऱ्या म्हणजे धनभावात शनि वक्री होत आहेत. त्यामुळे या काळात अप्रत्यक्षपणे धनलाभ मिळेल. अडकलेले पैसेही या काळात परत मिळू शकतात. कौटुंबिक वातावरण आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागेल. वादापासून दूर राहिलेलं बरं राहील.
कुंभ : या राशीतच शनिदेव वक्री होत आहेत. त्यामुळे खर्चात वाढ होईल. तसेच आर्थिक घडी बिघडल्याने उसनवारी मागण्याची वेळ येईल. त्यामुळे कौटुंबिक वातावरण गढूळ राहील. विनाकारण वाद होईल असं वागू नका. सामंज्यसपणे एक एक पाऊल उचला.
मीन : या राशीच्या बाराव्या स्थानात शनि वक्री होत आहेत. त्यामुळे अशुभ परिणामांना सामोरं जावं लागेल. कोणतंही काम करताना काळजी घ्या. भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. वाहन चालवताना काळजी घ्या. मोठा आर्थिक फटका बसू शकतो.