2024 च्या सुरुवातीला या राशींवर असेल शनिची वक्रदृष्टी, नोकरी आणि व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता
Astrology 2024 : 2023 हे वर्ष संपण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे नवं वर्षात ग्रहांची स्थिती कशी असेल? याकडे जातकांचं लक्ष लागून आहे. खासकरून शनिच्या स्थितीकडे लक्ष लागून आहे. चला जाणून घेऊयात याबाबत...
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहांची स्थिती राशीचक्रावर परिणाम करत असते. एकाच राशीवर काही ग्रह शुभ, तर काही ग्रह अशुभ परिणाम करत असतात. नवग्रहांची स्थिती राशीचक्रात वेगवेगळी असते. दोन महिन्यानंतर नवं वर्ष 2024 सुरु होणार आहे. या वर्षात ग्रहांच्या स्थितीसोबत शनिच्या स्थितीकडेही पाहिलं जात आहे. सध्या शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. 2024 या वर्षातही शनिदेव याच राशीत असतील. कारण शनिदेव एका राशीत जवळपास अडीच वर्षे ठाण मांडून बसतो. वर्षे 2024 या वर्षात शनिदेव अस्त, उदय आणि वक्री होणार आहे. 11 फेब्रुवारी 2024 ते 18 मार्च 2024 शनि अस्ताला जाईल. त्यामुळे त्याचा परिणाम राशीचक्रावर होईल. चला जाणून कोणत्या राशींना या कालावधीत काळजी घेण्याची गरज आहे ते…
या राशींनी काळजी घ्यावी
मेष : शनिदेव गोचर कुंडलीनुसार या राशीच्या एकादश भावात आहे. या स्थानाला उत्पन्न स्थान म्हंटलं जातं. त्यामुळे शनि अस्ताला गेले की त्यानुसार फळं मिळतील. या कालावधीत आर्थिक फटका बसू शकतो. आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकतात. पण शनि महाराजांना पुन्हा तेज प्राप्त झाल्यानंतर चिंता दूर होईल. गोचर कुंडलीनुसार शनि देव 18 मार्चला उदीत होतील.
वृषभ : या राशीच्य दशम स्थानात शनि अस्ताला जाणार आहे. दशम स्थान हे करिअर आणि व्यवसायाशी निगडीत असतं. त्यामुळे थोडी उलथापालथ दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी बॉसकडून दबाव येऊ शकतो. नोकरी बदलण्याच्या भानगडीत पडू नका. योग्य पगार आणि कामाचे तास याची सांगड घालून नंतरच विचार करा.
कन्या : शनि या राशीच्या षष्ठम स्थानात आहे. त्यामुळे शत्रूपक्षाकडून कुरघड्या होऊ शकतात. विनाकारण अडचणींचा डोंगर उभा राहील. ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते लोकं पाठ फिरवू शकतात. कौटुंबिक पातळीवरही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जोडीदारासोबत सामंजस्यपणे वागा. वाद होईल असं वागू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)