Maharashtra Assembly | 50 खोके एकदम ओके… विरोधकांच्या घोषणाबाजीवर शिंदे-भाजप सरकारची प्रतिक्रिया काय, गिरीश महाजन म्हणतात…
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. येत्या 25ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालेल. यातही तीन दिवसांच्या सुट्या आल्याने प्रलंबित प्रश्न मांडण्यासाठी खूप कमी वेळ असल्याचं मत विरोधकांनी व्यक्त केलं आहे.
मुंबईः विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Sassion) सुरुवातीला महाविकास आघाडीतर्फे (MVA) विधानभवनाच्या पायऱ्यांवर आक्रमक आंदोलन करण्यात आलं. 50 खोके, एकदम ओक्के सरकारचा धिक्कार असो. गद्दारांच्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदारांची तसेच भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. विधान भवनात पोहोचलेल्या गिरीश महाजनांनी यावर प्रतिक्रिया दिली. आंदोलन आणि घोषणाबाजी करणारे सगळे सध्या चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी ते अशा प्रकारे घोषणाबाजी करत असल्याचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय
गिरीश महाजन काय म्हणाले?
विरोधकांच्या घोषणाबाजीवर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, मला वाटतं त्यांची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. सरकार स्थिरसावर आहे.. हे सगळे चौकशीच्या फेऱ्यात आहे. यांना लोकांचं लक्ष विचलित करायचं आहे. आपल्यावर जे दररोज आरोप होत आहेत. ज्यांच्यावर आरोप झालेत ते सगळे जेलमध्ये आहेत. कोर्टही त्यांना बेल देत नाहीये. ईडीने अटक केली असेल पण पुरावे बघितल्यावर कोर्टानेही त्यांना जामीन दिलेली नाही.
25 ऑगस्टपर्यंत अधिवेशन
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. येत्या 25ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालेल. यातही तीन दिवसांच्या सुट्या आल्याने प्रलंबित प्रश्न मांडण्यासाठी खूप कमी वेळ असल्याचं मत विरोधकांनी व्यक्त केलं आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी शिंदे सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला झालेला विलंब, पालकमंत्र्यांअभावी विविध जिल्ह्यांमधील रखडलेल्या समस्या, अतिवृष्टीग्रस्तांना न मिळालेली मदत आदी प्रश्नांवरून विरोधक अधिवेशनात सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मविआ एकवटली
विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सुरुवातीला आज महाविकास आघाडी सरकारमधील विविध नेते एकवटले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, एकनाथ खडसे आदी नेते शिंदे-भाजप सरकारविरोधी घोषणा देण्यात अग्रेसर होते. विशेष म्हणजे भाजपमधील अंतर्गत नाराजी नाट्यावरही मविआतील नेत्यांनी घोषणाबाजी केली. सुधीरभाऊंना चांगलं खातं न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… आशीष शेलारांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा विरोधकांनी केल्या.
अधिवेशनापूर्वी मोहित कंबोज यांच्या ट्विटची चर्चा
दरम्यान, अधिवेशनाच्या दिवशी सकाळीच भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली. नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या नेत्यासाठी धोक्याची घंटा असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यावर ईडी किंवा तपास यंत्रणांची कारवाई होणार, यावरून चर्चांना सुरुवात झाली आहे.