Budh Vakri : 21 एप्रिल 2023 पासून बुध ग्रह वक्री, या राशींना मिळणार सकारात्मक पाठबळ
Budh Grah Vakri : ज्योतिषशास्त्रात चंद्रानंतर सर्वात वेगाने राशी बदलणारा ग्रह म्हणजे बुध. हा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ असल्याने अस्त, उदय आणि वक्री होण्याचं प्रमाण जास्त आहे. 21 एप्रिलपासून बुध ग्रह वक्री होत आहे.
मुंबई – ग्रहमानाच्या बदलामुळे ज्योतिषशास्त्राचे अनुमान सारखे बदलत असतात. कधी कोणती स्थिती उत्पन्न होईल सांगता येत नाही. त्यामुळे आधी चांगली फळं देणारा ग्रह उद्या तशीच फळं देईल हे सांगता येत नाही. अनेकदा एखादा ग्रह शुभ फळं देत असताना दुसरा ग्रह अशुभ फळं देत असतो. त्यामुळे चांगलं वजा वाईट करून जे नशिबी येईल ते पुण्य समजावं, असा ज्योतिषशास्त्राचा नियम आहे. एप्रिल 2023 हा ग्रहांच्या गोचराच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचा महिना आहे. ग्रहांच्या दशा दिशांमुळे जातकांवर विपरीत परिणाम होत असतो. आता बुध ग्रह 21 एप्रिलपासून वक्री अवस्थेत जात आहे.
ग्रहाचं वक्री होणं म्हणजे उलट्या दिशेने चाल करणे. सूर्य आणि चंद्र कधीच वक्री होत नाही. तर राहु आणि केतु मात्र कायम वक्री दिशेने चाल करतात. वक्री ग्रहाच्या प्रभावाबाबत ज्योतिषशास्त्रात भिन्न भिन्न मतं आहेत. ज्योतिषांच्या मते, वक्री ग्रह आपल्या उलट्या मार्गक्रमणामुळे उच्च राशीत नीच फळं आणि नीच राशीत उच्च फळं देतो. तर मतप्रवाह असा आहे की, वक्री ग्रह कायम नकारात्मक परिणाम देतो.
बुधाची वक्री चाल तीन राशींना फलदायी
सिंह – बुधाची वक्री चाल सिंह राशीच्या जातकांसाठी चांगली ठरेल. कारण बुध ग्रह या राशीच्या भाग्य स्थानात वक्री होत आहे. त्यामुळे नशिबाची चांगली साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. तसेच पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांनाही चांगला फायदा मिळेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. पण 14 एप्रिलपासून सूर्य राहुच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होत आहे. त्यामुळे वडिलांच्या आणि तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
तूळ – या राशीच्या जातकांनाही बुध ग्रहाची वक्री चाल लाभदायी ठरेल. या राशीच्या सप्तम भावात बुध वक्री होत आहे. बुध ग्रह या राशीच्या 12 व्या आणि भाग्य स्थानाचे स्वामी आहेत. त्यामुळे नशिबाची साथ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठं फळ मिळू शकतं. पार्टनरशिपच्या धंद्यात यश मिळेल. पण राहु सूर्याच्या युतीमुळे जोडीदारासोबत काही कारणामुळे वाद होऊ शकतात. असं असलं तरी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
धनु – या राशीच्या जातकांना वक्री बुध चांगली फळं देईल. बुध ग्रह या राशीच्या पंचम स्थानात भ्रमण करत आहे. त्याचबरोबर सप्तम आणि दशम स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे अचानकपणे तुम्हाला काही बदल दिसून येतील. ज्या कामात हात टाकाल ते काम यशस्वीरित्या पूर्ण होईल.नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. पण पैशांचा व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)