मकर राशीत सूर्य आणि बुधाची होणार युती, बुधादित्य योगामुळे 1 फेब्रवारीपासून या राशींना मिळणार साथ
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांचा गोचर कालावधी हा ठरलेला आहे. एखाद्या राशीत कालावधी पूर्ण केल्यानंतर ग्रह पुढच्या मार्गाला लागतात. अशीच काही स्थिती 1 फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे. बुध ग्रह धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींना फायदा होणार आहे.
मुंबई : राशीचक्रात प्रत्येक क्षणाला घडामोडी घडत असतात. एखादा काही अंशात जरी कलला तरी त्याचा परिणाम होतो. त्यामुळे अचूक भाकीत वर्तवणं खूपच कठीण असतं. ज्योतिषी बराच अभ्यास केल्यानंतर एका दृष्टीकोनातून आपलं भाकीत वर्तवत असतात. बुध हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ असलेला ग्रह आहे. या दोन्ही ग्रहांमध्ये मैत्रिपूर्ण संबंध आहेत. सूर्याला ग्रहमंडळाचा राजा, तर बुधाला राजकुमार संबोधलं जातं. या दोन्ही ग्रहांची युती शुभ मानली जाते. या युतीला ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योग म्हंटलं जातं. 1 फेब्रुवारीला बुध ग्रह धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सूर्यदेव आधीच विराजमान आहेत. त्यामुळे 1 फेब्रुवारीपासून सूर्य गोचर करेपर्यंत बुधादित्य योग असेल. जवळपास 13 दिवस बुधादित्य योग तीन राशींच्या पथ्यावर पडणार आहे. चला जाणून घेऊयात तीन लकी राशींबाबत
या राशींना मिळणार लाभ
मेष : या राशीच्या दशम स्थानात बुधादित्य योग तयार होणार आहे. या स्थानावरून करिअरबाबत आकलन केलं जातं. बुद्धीकारक बुध ग्रह आणि राजासारखा सूर्य जर राशीत असेल तर करिअरमध्ये नक्कीच प्रगती दिसून येईल. नोकरीच्या काही संधी चालून येतील. विदेशात नोकरी करण्याचं स्वप्न देखील या कालावधीत पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभेल. उद्योगधंद्यात अपेक्षित यश मिळेल. भागीदारीच्या धंद्यात नशिब फळफळेल.
वृषभ : या राशीच्या नवम स्थानात बुधादित्य योग तयार होत आहे. त्यामुळे नशिबाची जोरदार साथ मिळेल. एखादी इच्छा पूर्ण होताना दिसेल. शेअर बाजार, लॉटरीतून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी पगारवाढ किंवा पदोन्नती होण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायातून तुम्हाला अपेक्षित कमाई होईल. कौटुंबिक स्तरावर आर्थिक गणित सुधारलेलं पाहायला मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील.
धनु : या राशीच्या द्वितीय स्थानात बुधादित्य योग तयार होणार आहे. हे स्थान धन आणि वाणीचं स्थान आहे. बुधाची सूर्यासोबतची युती या दोन्ही गोष्टींना बळ देईल. बुधामुळे वाणी आणि सूर्यामुळे धन मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळेल. जमिनीचा गेल्या काही दिवसांपासून असलेला वाद संपुष्टात येईल. आई वडिलांच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)