तूळ राशीत चंद्र आणि केतुची झाली युती, तीन राशीच्या जातकांनी सव्वा दोन दिवस जरा सांभाळूनच
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचरासोबत बऱ्याच घडामोडी घडत असतात. चंद्राच्या वेगवान गोचरामुळे बरेच शुभ अशुभ योग घडून येतात. असाच अशुभ योग तूळ राशीत जुळून आला आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. चंद्राच्या स्थितीवरून त्या त्या जातकाची स्थिती होत असते, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. तसेच चंद्र हा सर्वात वेगाने भ्रमण करणारा ग्रह आहे. एका राशीत सव्वा दोन दिवस ठाण मांडल्यावर राशी बदल करतो. त्यामुळे चंद्राची युती महिनाभरात सर्वच ग्रहांशी होत असते. त्यामुळे शुभ अशुभ योगांची स्थिती जुळून येते. सध्या चंद्र हा तूळ राशीत आला असून केतुसोबत युती केली आहे. या युतीमुळे अशुभ असा ग्रहण योग तयार झाला आहे. त्याचा परिणाम राशीचक्रावर होईल. खासकरून तीन राशीच्या जातकांना सव्वा दोन दिवस जरा सांभाळूनच राहावं लागेल.
कशी आहे चंद्राची स्थिती
चंद्र कन्या राशीतून तूळ राशीत 25 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजून 12 मिनिटांनी आला आहे. केतुसोबत युतीमुळे ग्रहण योग तयार झाला आहे. ही युती सव्वा दोन दिवस असेल. चंद्र 27 जुलै 2023 तूळ राशीतून वृश्चिक राशीत संध्याकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी प्रवेश करेल आणि ग्रहण सुटेल.
तीन राशींच्या जातकांना बसेल फटका
तूळ : चंद्र आणि केतु यांची युती याच राशीत होत आहे. त्यामुळे जातकांची मानसिक स्थिती या काळात बिघडेल. ग्रहण योगामुळे तणाव, अतिविचार, आर्थिक संकटांचा सामना करावा लागून शकतो. तसेच आरोग्य विषयक तक्रारही डोकं वर काढू शकते. या काळात आत्मविश्वास कमी होईल आणि शत्रू पक्ष तुमच्या हावी होईल अशी स्थिती आहे.
मेष : या राशीच्या आठव्या स्थानात केतु गोचर करत आहे. आता चंद्र आल्याने जातकाच्या वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो.
वृषभ : या राशीच्या दुसऱ्या स्थानात केतु ग्रह आहे. हे धन स्थान असल्याने चंद्राच्या युतीमुळे ग्रहण लागेल. या काळात मानसिक संतुलन बिघडू शकते. त्यामुळे एकटेपणाची जाणीव होईल. याचबरोबर कुटुंब आणि मित्रांसोबत संबंध बिघडू शकतात. काही कारणामुळे वाद होऊ शकतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)