तूळ राशीत चंद्राच्या गोचरामुळे सव्वा दोन दिवस ग्रहण योग, 7 ते 9 एप्रिल या राशीच्या जातकांनी जपून
चंद्र सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीत फक्त काही तासांसाठी चंद्र स्थित असतो. असं असलं तरी त्या तासात मानसिक स्थितीवर चंद्र परिणाम करतो. त्यामुळे चंद्राच्या गोचराकडेही पाहणं महत्त्वाचं ठरतं.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. त्यात चंद्र हा सर्वात वेगाने राशी बदल करणारा ग्रह आहे. त्यामुळे चंद्र आणि इतर ग्रहांच्या युतीमुळे शुभ अशुभ योग तयार होतात. चंद्र जरी वेगाने राशी बदल करत असला तरी सव्वा दोन दिवस जातकाच्या मनावर अधिराज्य गाजवतो. त्यामुळे त्या दिवसात जातकाची मनस्थिती विनाकारण खराब झालेली दिसते. अनेकदा चंद्र बळ मिळाल्याने मनासारख्या गोष्टी घडतात. भारतात तर चंद्र ज्या राशीत स्थित असतो ती रास मानली जाते. त्यावरून ज्योतिष भाकीत करत असतात. 7 एप्रिलपासून चंद्र तूळ राशीत सव्वा दोन दिवस ठाण मांडणार आहे.
तूळ राशीत दीड वर्षांसाठी केतु ग्रह असल्याने चंद्राच्या संपर्कात येणार आहे. त्यामुळे चंद्र आणि केतुच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होणार आहे. त्यामुळे काही जातकांना त्याचा फटका बसणार आहे. हा योग 9 एप्रिलपर्यंत असणार आहे. 7 एप्रिलला चंद्र कन्या राशीतून तूळ राशीत रात्री 1 वाजून 10 मिनिटांनी प्रवेश करेल. तसेच 9 एप्रिल 2023 ला सकाळी 8 वाजून 2 मिनिटांपर्यंत असणार आहे.
चंद्र गोचर आणि स्थिती
तूळ – चंद्र प्रथम भावात असल्याने हा काळ चांगला असतो. करिअरच्या दृष्टीने चांगली वेळ असते. पण ग्रहण योगामुळे काही अडचणी येऊ शकतात. कदाचित होणाऱ्या कामात बाधा येऊ शकते. यासाठी चंद्राला अर्घ्य देवून चंद्र मंत्राचा जाप करावा. यामुळे चंद्र बळ वाढण्यास मदत होईल.
वृश्चिक – चंद्राचं द्वादश भावात असल्याने तो कर्मानुसार फळ देतो. जर तुम्ही चुकीचं काम करत असाल तर तात्काळ सावध राहा. कारण ग्रहण योगामुळे तुम्हाला फटका बसू शकतो. भगवान महादेवांची पूजा करा.
धनु – या राशीत चंद्र गोचर एकादश भावात होणार आहे. त्यामुळे सकारात्मक आणि चांगले बदल दिसून येतील. जोडीदारासोबत तुम्ही तुमचा चांगला वेळ घालवाल. चंद्र बीजाचा रोज 108 वेळा जाप करा.
मकर – चंद्राचा दशम भावातील गोचर तुमच्यासाठी फलदायी ठरेल. पण ग्रहण योग असल्याने जास्त मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा काही जणांना कदाचित पटणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. वाणीवर नियंत्रण ठेवा.
कुंभ – चंद्र नवम भावात असल्याने वरिष्ठांचा दबाव सहन करावा लागू शकतो. तसेच केलेल्या मेहनतीचं फळ मिळणार नाही. तसेच शत्रुपक्ष तुमच्यावर या काळात हावी झालेला दिसेल. त्यामुळे शांत राहून देवाची आराधना करण्यावर जोर द्या.
मीन – चंद्र अष्टम भावात आणि ग्रहण योग असल्याने कामात काही अडचणी दिसतील. बॉससोबत काही कारणामुळे वाद होऊ सकतो. त्यामुळे या काळात जरा सांभाळूनच राहा. गरजेपुरतं बोलणं फायदेशीर ठरेल.
मेष – चंद्राचं सप्तम भावात गोचर आणि ग्रहण योग यामुळे जोडीदारासोबत काही वाद होण्याची शक्यता आहे. शब्दाने शब्द वाढतो हे लक्षात ठेवा. अन्यथा जोडीदारासोबत टोकाचे मतभेद होऊ शकतात. त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा.
वृषभ – षष्टम भावातील चंद्राचं गोचर तसं पाहिलं तकर उत्साही आणि बळ देणारं असतं. पण केतुच्या संपर्कात आल्याने चंद्र तशी फळं देणार नाही. उलट मानसिक स्थिती बिघडू शकते. विनाकारण या काळात भीती वाटू शकते.
मिथुन – पंचम भावातील चंद्र तसा त्रासदायक ठरतो. त्यात ग्रहण योग असल्याने सव्वा दोन दिवस तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागेल. गुंतवणुकीतून आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे व्यवहार करताना काळजी घ्या.
कर्क – चतुर्थम भावात चंद्र आणि केतुची युती पाहता कौटुंबिक वातावरण बिघडेल. आर्थिक स्थिती ठिक नसल्याने वाद होतील. गुंतवणूक करताना काळजी घ्या. अन्यथा तुम्हाला फटका बसू शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत विनाकारण वाद करणं टाळा. त्यामुळे तुम्हालाच त्रास होऊ शकतो.
सिंह – तृतीय भावातील चंद्र तसा लाभदायी असतो. केतुमुळे थोडासा फटका बसेल. पण कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुम्हाला अपेक्षित मान सन्मान मिळेल. तुमची आर्थिक स्थिती थोडी का होईना सुधारलेली दिसेल.
कन्या – चंद्र द्वितीय भावात चांगली फळ देत नाही. त्यामुळे हा काळ कठीण असेल. शत्रूपक्षाकडून तुम्हाला नाहक त्रास होईल. देवाणघेवाण करण्यापूर्वी योग्य काळजी घ्या. मनस्थिती बिघडेल असं वागू नका. शांत आणि वाणीवर संयम ठेवा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)