सव्वा दोन दिवस चंद्र आणि शनि येणार एकत्र, विष योगामुळे तीन राशींना बसणार फटका
ज्योतिषशास्त्रात चंद्र हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. महिन्याभरात 13 ते 14 वेळा चंद्र गोचर करतो. त्यामुळे इतर ग्रहांसोबत होणाऱ्या युतीमुळे शुभ अशुभ योग घडून येतात.
मुंबई – ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. तर शनि हा सर्वात मंद गतीने गोचर करणारा ग्रह गणला जातो. चंद्र एका राशीत सव्वा दोन दिवस राहतो आणि नंतर दुसऱ्या राशीत गोचर करतो. दुसरीकडे, शनिदेव एका राशीत अडीच वर्षे ठाण मांडून असतात. शनिदेव ज्या राशीत असतात त्या राशीला साडेसातीचा मधला टप्पा सुरु असतो. शनिदेव 17 जानेवारी 2023 पासून कुंभ राशीत आहेत. 15 एप्रिल 2023 रोजी चंद्र गोचर करत कुंभ राशीत जाणार आहे. त्यामुळे विष योग तयार होणार आहे.
शनि आणि चंद्राच्या युतीला ज्योतिषशास्त्रात विष योग संबोधलं गेलं आहे. हा अशुभ योगांपैकी एक आहे. 15 एप्रिल 2023 रोजी चंद्र मकर राशीतून कुंभ राशीत प्रस्थान करेल. संध्याकाळी 6 वाजून 43 मिनिटांनी हा प्रवेश असेल. त्यामुळे या राशीत असलेल्या शनिदेवांसोबत युती होईल.
17 एप्रिल 2023 रोजी चंद्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. मीन राशीत रात्री 8 वाजून 51 मिनिटांनी प्रवेश करणार आहे. त्यामुळे गुरुच्या सान्निध्यामुळे गजकेसरी योग जुळून येईल. सव्वा दोन दिवस हा योग असणार आहे.
विष योगामुळे सव्वा दोन दिवस तीन राशींना फटका बसेल
कर्क – या राशीवर शनिची अडीचकी सुरु आहे. चंद्र आणि शनिची युती कर्क राशीच्या लोकांना डोकेदुखी ठरेल. कारण या राशीच्या अष्टम भावात ही युती होत आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. घरात वडिलधाऱ्या व्यक्तीची तब्येत ढासळू शकते. तसेच नवीन काम सुरु करण्यासाठी ही योग्य वेळ नाही. गुंतवणूकही फलदायी ठरणार नाही. दुसरीकडे वादात न अडकता शांत राहणं उचित राहील.
कन्या – या राशीच्या षष्टम भावात विष योग तयार होत आहे. त्यामुळे हा काळ अडचणींचा ठरेल. न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला अपयश मिळू शकते. कौटुंबिक वातावरण चांगलं नसल्याने मानसिक संतुलन बिघडेल. जोडीदारासोबत काही कारणावरून वाद होऊ शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या. कारण एखादा अपघात होऊ शकतो. अध्यात्मिक कार्यात रुची वाढवा.
वृश्चिक – या राशीच्या जातकांना शनिची अडीचकी सुरु आहे. त्यामुळे चतुर्थ स्थानातील शनि चंद्राची युती त्रासदायक ठरेल. सव्वा दोन दिवस तुमचं मानसिक संतुलन बिघडलेलं असेल. आई वडिलांची काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच काही अशुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच धनहानी होण्याची स्थिती आहे. त्यामुळे सावधपणे पावलं उचला.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)