Guru Vakri : चार महिने गुरु वक्री अवस्थेत करणार भ्रमण, तीन राशींना होणार जबरदस्त फायदा
Jupiter Vakri In Mesh : गुरु ग्रह सध्या मेष राशीत विराजमान आहे. आता चार महिने वक्री स्थिती असणार आहे. यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी हा ठरलेला असतो. ग्रहांचा गोचर कालावधी कमी अधिक असतो. शनि, राहु-केतु, गुरु हे एका राशीत सर्वाधिक काळ ठाण मांडून बसतात. त्यामुळे या राशींची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते. सुख, समृद्धी आणि ज्ञानाचा कारक असलेला गुरु ग्रह सध्या मेष राशीत आहे. एप्रिल 2023 पासून या राशीत असून 13 महिने असणार आहे. दुसरीकडे, राहु हा ग्रह देखील मेष राशीत दीड वर्षांसाठी ठाण मांडून बसला आहे. 30 ऑक्टोबर 2023 ला मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे गुरु आणि राहुची अभद्र युती दीड महिनाच असणार आहे. दुसरीकडे, गुरु ग्रह मेष राशीत 4 सप्टेंबरपासून वक्री स्थितीत आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.
तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ
सिंह : गुरु ग्रहाची वक्री स्थिती या राशीच्या जातकांना फलदायी ठरणार आहे. कारण या राशीच्या नवम स्थानात गुरु वक्री झाला आहे. त्याचबरोबर पंचम आणि अष्टम स्थानाचा स्वामी देखील आहे. या कालावधीत नोकरीची संधी मिळू शकते. रिसर्च क्षेत्राशी निगडीत लोकांना लाभ मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी चांगला असणार आहे. मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल.
धनु : गुरु ग्रह या राशीच्या पंचम स्थानात वक्री झाला आहे. तसेच लग्न आणि 12 व्या स्थानाचं स्वामित्व आहे. त्यामुळे या कालावधीत सकारात्मक उर्जा दिसून येईल. आत्मविश्वास दुणावलेला राहील. पैशांची बचत करण्यात यश मिळेल. प्रेम प्रकरणात अपेक्षित यश मिळेल. घरच्यांचा होकार मिळाल्याने नव्या जीवनाची सुरुवात करण्यास वाट मिळेल. अध्यात्म, कथावाचन करताना आत्मिक सुख मिळेल.
मकर : या राशीच्या चतुर्थ स्थानात गुरु ग्रह वक्री होत आहे. तसेच तिसऱ्या आणि बाराव्या स्थानाचा स्वामित्त्व आहे. त्यामुळे साहस आणि पराक्रमता वृद्धी होताना दिसून येईल. वाहन आणि प्रॉपर्टी खरेदीचा योग जुळून येईल. वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळेल. अविवाहित लोकांना लग्नासाठी स्थळं चालून येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित लाभ मिळेल. या कालावधीत आपल्याकडून कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)