Horoscope 2023 : गुरु ग्रह वक्री झाल्याने तयार झाला शक्तिशाली अमला राजयोग, तीन राशींवरचं संकट टळणार
Guru Vakri Amla Rajyog : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवरून अंदाज वर्तवले जातात. त्यामुळे ग्रह कोणत्या स्थानात बसला आणि त्याचा स्वभाव कसा आहे, यावर बरंच काही अवलंबून असतं. सध्या गुरु ग्रह मेष राशीत वक्री अवस्थेत आहे आणि अमला राजयोग तयार झाला आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती यावरून मानवी जीवन आणि आसपास घडामोडी घडत असतात. शुभ अशुभ योगामुळे चांगले वाईट परिणाम भोगावे लागतात. सध्या गुरु ग्रह हा वर्षभरासाठी मेष राशीत ठाण मांडून बसला आहे. त्यात राहुसोबत असल्याने अशुभ असा चांडाळ योग तयार झाला आहे. देवगुरु बृहस्पती 4 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजू 58 मिनिटांना मेष राशीत वक्री होणार आहे. गुरु वक्री स्थितीत जाताच काही राशींच्या जातकांना लाभ मिळणार आहे. इतकंच काय तर शक्तिशाली असा अमला राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात हा अत्यंत शुभ योग मानला जातो. ज्योतिषशास्त्रातील गणितानुसार कुंडलीत चंद्रापासून किंवा लग्नपासून दहाव्या स्थानात गुरु विराजमान असेल तर अमला राजयोग तयार होतो. चला जाणून घेऊयात गुरुच्या शुभ स्थितीमुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे.
या राशीच्या जातकांना मिळणार लाभ
मिथुन : अमला राजयोगामुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. करिअरमध्ये बराच फरक दिसून येईल. चढत्या आलेखामुळे करिअरमध्ये नवीन उंची गाठाला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती भक्कम होताना दिसेल. बँकेतील बचत वाढेल. शेअर बाजार आणि म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. कौटुंबिक स्तरावर आनंदाचं वातावरण राहील. पत्नीसोबत बाहेरगावी फिरायला जाण्याचा योग जुळून येईल.
सिंह : या राशीने गेल्या काही दिवसात बरीच उलथापालथ पाहिली आहे. पण सूर्याने एन्ट्री घेताच दिलासादायक चित्र निर्माण झालं आहे. आता गुरुच्या वक्री स्थितीमुळे आणखी पाठबळ मिळेल. अमला राजयोगामुले विशेष लाभ मिळेल. आत्मविश्वास दुणावलेला राहील आणि हाती घेतलेली कामं झटपट पूर्ण कराल. काही किचकट कामं पूर्ण कराल. समाजात मानसन्मान वाढेल. कौटुंबिक कार्य पार पडतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.
मीन : शनि साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात कामांचा खोळंबा झाला आहे. पण गुरुच्या साथीमुळे हा गुंता सुटेल. अमला राजयोगामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायातील अडचणी दूर होतील. तसेच गेल्या काही दिवसांपासून आखलेले प्लान पूर्णत्वास येतील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मुलांकडून काही चांगल्या बातम्या कानावर पडतील. त्यांची अभ्यासातील प्रगती पाहून तुम्हाला वेगळाच आनंद मिळेल. मित्रांच्या भेटीगाठी होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)