Panchak August 2023 : आजपासून पंचक सुरू, पुढचे पाच दिवस या चुका अवश्य टाळा
पंचक काळात मृत्यूशी संबंधित अनेक समजुती आहेत. पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील आणखी पाच जणांचा मृत्यू होतो अशीही अनेकांची मान्यता आहे.
मुंबई : आज म्हणजेच 2 ऑगस्ट 2023 पासून पंचक (Panchak August 2023) कालावधी सुरू झाला आहे. हिंदू धर्मात पंचक काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पंचक काळ 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान चालेल. पंचक काळ कोणत्याही कामासाठी शुभ मानला जात नाही. धनिष्ठ नक्षत्र, उत्तराभाद्रपदा, पूर्वाभाद्रपद, रेवती आणि शतभिषा नक्षत्राच्या तिसर्या चरणात चंद्राचे भ्रमण झाल्यावर पंचक कालावधी सुरू होतो. या काळात कोणत्या गोष्टी टाळाव्यात या बद्दल जाणून घेऊया.
पंचक काळ सुरू होण्याची वेळ
पंचक दर महिन्यात येते. या वेळी पंचक 2 ऑगस्ट 2023 रोजी 11.26 मिनिटे 54 सेकंदांनी सुरू होईल आणि सोमवार, 7 ऑगस्ट रोजी 1.44 मिनिटे 5 सेकंदांनी संपेल.
ज्योतिषांच्या मते अशी 5 नक्षत्रे आहेत ज्यांच्या विशेष संयोगाने पंचक नावाचा योग तयार होतो. चंद्र जेव्हा कुंभ आणि मीन राशीत भ्रमण करत असतो, त्या वेळी पंचक होते. असे मानले जाते की पंचक दरम्यान कोणतेही शुभ कार्य करू नये आणि पंचकची विशेष काळजी घ्यावी.
पंचक दर महिन्याला दिसते
प्रत्येक महिन्यात पंचकचे पाच दिवस असतात. धनिष्ठ नक्षत्राच्या तिसर्या चरणापासून पंचक सुरू होऊन रेवती नक्षत्रावर समाप्त होते. हिंदू धर्मात पंचक प्रसंगी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत. मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे आवश्यक असल्यास, पिठाचे पुतळे बनवून त्याची विधिवत पूजा केल्यानंतरच करता येते.
दुसर्या मान्यतेनुसार, रावणाचा वध प्रभू रामाने केला तेव्हा पंचक सुरू होते. सनातन धर्मात पंचक काळ अत्यंत अशुभ मानला जातो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी काही विशेष कार्य करणे देखील निषिद्ध आहे.
पंचक काळात मृत्यूशी संबंधित अनेक समजुती आहेत. पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील आणखी पाच जणांचा मृत्यू होतो अशीही अनेकांची मान्यता आहे. हे टाळण्यासाठी पंचक काळात मृत व्यक्तीच्या शरिरावर कणकीचे पुतळे ठेवून अंत्यसंस्कार करण्याची पद्धत आहे
पंचक काळात ही कामे करू नये
सनातन धर्माच्या अनुयायांना पंचक काळात लाकूड खरेदी करण्यास मनाई आहे. पंचक काळात घर बांधताना स्लॅब घालणे देखील अशुभ मानले जाते. याशिवाय या काळात पलंग बनवने, दक्षिणेकडे यात्रा करणे देखील अशुभ मानले जाते.
पंचकाबद्दल आणखी एक समज आहे की एका पंचक काळात केलेले शुभ कार्य पाच वेळा करावे लागते. पंचक संपल्यानंतर लग्न, मुंडण, इमारत बांधणे किंवा वास्तूशांती करणे यासारखी शुभ कार्ये करता येतात.
गरुड पुराणानुसार पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित नक्षत्राच्या मंत्राने अंत्यसंस्कार करावेत. नियमानुसार केलेले यज्ञ पुण्यकारक फळ देते. शक्य असल्यास या काळात तीर्थक्षेत्रात अंत्यसंस्कार करावेत. यामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)