Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन नेमकं 30 की 31 ऑगस्टला? भद्रा कालावधीबाबत जाणून घ्या
Raksha Bandhan 2023 : भाऊबहिणीचं नातं दृढ करणारा रक्षाबंधन हा सण आहे. मात्र भद्रा काळामुळे मुहूर्ताबाबत संभ्रम असतो. यंदा रक्षाबंधन 30 ऑगस्टला की 31 ऑगस्टला ते जाणून घ्या...
मुंबई : हिंदू धर्मात रक्षाबंधन हा एक महत्वाचा सण आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. भारतात मोठ्या उत्साहाने बहिण भावाचं नातं सांगणारा हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन घेते. पण यंदा पौर्णिमेची तिथी दोन दिवसात विभागून आली आहे. 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या दोन दिवशी पौर्णिमा तिथी असणार आहे. यापैकी कोणत्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा करणं योग्य ठरेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शास्त्रानुसार भद्रा कालावधीत रक्षाबंधन सण साजरा करणं अशुभ मानलं जातं. चला जाणून घेऊयात रक्षाबंधन शुभ मुहूर्त, भ्रदा कालावधी आणि इतर काही योगांबाबत..
रक्षाबंधन तिथी आणि भद्रा कालावधी
30 ऑगस्टला सकाळी 10 वाजून 59 मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार आहे. तर 31 ऑगस्टला सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपणार आहे. 30 ऑगस्टला पौर्णिमा तिथी सुरु होताच भद्रा काल सुरु होणार आहे. रात्री 8 वाजून 50 मिनिटांपर्यंत हा कालावधी असणार आहे. या कालावधीत राखी बांधू नये असं शास्त्रात सांगितलं आहे. म्हणजेच 30 ऑगस्टला रात्री 8.50 मिनिटांपासून 31 ऑगस्टच्या सकाळी 7 वाजून 5 मिनिटांपर्यंत राखी बांधता येईल.
भद्रा कालावधीत राखी का बांधत नाही?
सूर्यदेव आणि छाया यांच्या कन्येचं नाव भद्रा आहे. भद्रा ही शनिदेवांची बहीण असून क्रूर स्वभावाची आहे. तिचं रुपही कुरुप असल्याने सूर्यदेव तिच्या विवाहाबाबत चिंतित असत. भद्रा शुभ कार्यात विघ्न टाकायची. इतकंच काय तर यज्ञासारखी शुभ कार्यही होऊ देत नव्हती. तेव्हा सूर्यदेवांनी ब्रह्मदेवांकडे साकडं घातलं होतं. तेव्हा त्यांनी भद्राला सांगितलं होतं की, तुझ्या कालावधीत कोणी काही कार्य करत असेल तर तू विघ्न टाकू शकते. पण या व्यतिरिक्त असलेल्या कालावधीत तसं तुला करता येणार नाही. यामुळे भद्राकाळात शुभ कार्य केली जात नाहीत. भद्रा काळात पूजा, जप आणि ध्यान करू शकतो.
रक्षाबंधनचं पौराणिक महत्त्व
राखीच्या धाग्याला रक्षासूत्र संबोधलं जातं. राजसूय यज्ञाच्या वेळी भगवान कृष्णाला द्रोपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची चिंधी बांधली होती. तेव्हापासून ही परंपरा सुरु झाली, असं सांगण्यात येत आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)