Astrology 2023 : सिंह राशीत शुक्र करणार गोचर, संपूर्ण जुलै महिना तीन राशींना फलदायी
ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह चांगल्या स्थितीत असतो त्याला भौतिक सुखांची काही कमी नसते. त्यामुळे कुंडलीत शुक्राची स्थिती पाहिली जाते. गोचर कुंडलीत शुक्राची हालचाल कशी असेल पाहूयात.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राची गणना शुभ ग्रहात केली जाते. शुक्र हा ग्रह प्रेम, कला, शारीरिक आणि भौतिक सुख, धन, आनंद, संगीत, नृत्याशी निगडीत आहे. हस्तारेषा शास्त्रातही तळहाताच्या अंगठ्याच्या शेजारी असलेला उंचवटा शुक्राचा असतो. या उंचवट्यावरून व्यक्तीतील आकर्षण, सौंदर्य आणि वासनेचा अंदाज घेतला जातो. शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे. आता शुक्र ग्रह 7 जुलै 2023 रोजी कर्क राशीतून सिंह राशीत गोचर करणार आहे. या राशीत शुक्र ग्रह 23 जुलैपर्यंत असणार आहे. जवळपास 16 दिवस शुक्र ग्रह सिंह राशीत असेल त्यानंतर वक्री होणार आहे. शुक्राचं सिंह राशीत आगमन होताच तीन राशींना त्याचा जबरदस्त लाभ मिळणार आहे.
या तीन राशींना मिळणार लाभ
मेष : या राशीच्या जातकांना शुक्राची साथ लाभणार आहे. प्रेम प्रकरणात आणि जोडीदारीच्या व्यवसायात यश मिळताना दिसेल. नात्यांमध्ये खोलपणा जाणवेल आणि प्रेमळ भावना उतू येतील. आपल्या प्रिय व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनातही आनंद अनुभवायला मिळेल. वाणीच्या जोरावर आकर्षित करू शकता. काही कामं गोड बोलण्याने पूर्ण होतील. पार्टनरशिपच्या धंद्यात अपेक्षित यश मिळेल. तसेच समाजात मान सन्मान वाढेल.
वृषभ : शुक्राची साथ या राशीच्या जातकांनीही मिळणार आहे. घरात सुख समृद्धी नांदताना दिसेल. तसेच प्रत्येक कामातून समाधान लाभेल. शुभ कार्यासाठी हा काळ योग्य असणार आहे. या कालावधीत नवीन गाडी किंवा घर खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्या जातकांना अपेक्षित फळ मिळेल. तसेच उद्योग धंद्यात आर्थिक स्रोत निर्माण झाल्याने आनंदी राहाल. हाती घेतलेला प्रोजेक्ट या कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जोडीदारासोबत प्रेमसंबंध आणखी दृढ होतील.
तूळ : या राशीच्या जातकांना शुक्र ग्रहाचं गोचर बऱ्याच दिवसांनी फळ देणारं असेल. या गोचरामुळे उत्पन्नात वाढ होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात प्रगती होताना दिसेल. इतकंच काय स्वभाव बदलल्याने तुम्हालाच आश्चर्य वाटेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)