वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शुक्राची असेल तीन राशींवर कृपादृष्टी, गोचर कुंडलीतील ही स्थिती ठरेल लाभदायी
शुक्राची स्थिती ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाची ठरते. कारण शुक्र हा ग्रह भौतिक सुखांचा कारक आहे. त्यामुळे शुक्राच्या स्थितीकडे ज्योतिष्याचं बारीक लक्ष असतं. शुक्र ग्रह 25 डिसेंबरला गोचर करणार आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळेल. चला जाणून घेऊयात शुक्राची स्थिती आणि लकी तीन राशींबाबत
![वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शुक्राची असेल तीन राशींवर कृपादृष्टी, गोचर कुंडलीतील ही स्थिती ठरेल लाभदायी वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शुक्राची असेल तीन राशींवर कृपादृष्टी, गोचर कुंडलीतील ही स्थिती ठरेल लाभदायी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/12/Shukra_Gochar-2.jpg?w=1280)
मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशेष असा दर्जा देण्यात आला आहे. प्रत्येक ग्रह आपल्या स्वभावानुसार फळं देत असतो. नवग्रहांमधील शुक्र ग्रहाला धन, वैभव, ऐश्वर्य आणि भौतिक सुखांचा कारक मानलं जातं. 25 डिसेंबरला शुक्र ग्रह आपल्या स्वरास असलेल्या तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे राशीचक्रात बरीच उलथापालथ पाहायला मिळणार आहे. शुक्राच्या या स्थितीमुळे तीन राशीच्या जातकांना जबरदस्त लाभ मिळणार आहे. अचानक धनलाभ किंवा भौतिक सुखांची प्राप्ती होईल. वृश्चिक राशीत शुक्र ग्रह तूळ राशीत दुसऱ्या, कन्या राशीत तिसऱ्या, सिंह राशीत चौथ्या, कर्क राशीत पाचव्या, मिथुन राशीत सहाव्या, वृषभ राशीत सातव्या, मेष राशीत आठव्या, मीन राशीत नवव्या, कुंभ राशीत दहाव्या, मकर राशीत अकराव्या आणि धनु राशीत बाराव्या स्थान असणार आहे.
तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार
तूळ : गोचर कुंडलीनुसार तूळ राशीच्या जातकांना लाभ मिळेल. कारण या राशीच्या धन आणि वाणी स्थानात गोचर असणार आहे. त्यामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून अडकलेला पैसा परत मिळू शकतो. मोठा आर्थिक व्यवहार 2024 च्या सुरुवातीला घडून येईल. आरोग्यविषयक तक्रारीही दूर होतील. तसेच व्यक्तिमत्वातही फरक दिसून येईल. एकंदरीत कामाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती दिसून येईल.
वृषभ : या राशीच्या सप्तम स्थानता शुक्राचा गोचर असणार आहे. त्यामुळे पत्नी आणि पतीच्या नात्यात गोडवा निर्माण होईल. वैवाहिक जीवन आनंदात जाईल. पार्टनरशिपच्या धंद्यात यश मिळेल. अविवाहित लोकांचा विवाह निश्चित होऊ शकतो. कौटुंबिक स्तरावर आनंदी वातावरण राहील. न्यायालयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळू शकते.
मकर : या राशीच्या एकादश भावात शुक्राचं गोचर असणार आहे. या राशीचं स्वामित्त्व शनिकडे असून साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. पण शुक्र आणि शनि ग्रहामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे शुक्राची उत्तम साथ या कालावधीत लाभेल. एकदाश स्थान लाभ आणि उत्तन्नाचं स्थान आहे. त्यामुळे शुक्राच्या स्थितीचा राशीचक्रावर चांगला परिणाम दिसून येईल. गेल्या काही दिवसांपासून अतृप्त इच्छा पूर्ण होऊ शकतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)