Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणात ग्रहांची विचित्र स्थिती आणि अशुभ योग, 3 राशींसाठी दुष्काळात तेरावा महिना
Solar Eclipse 2023 : 20 एप्रिल 2023 रोजी वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण लागणार आहे. हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे सूतक कालावधी मान्य नसेल. पण राशीचक्रावर त्याचा परिणाम दिसून येईल.
मुंबई : सूर्यग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात त्याला खूप महत्त्व आहे. पौराणिक कथा पाहता ज्योतिषशास्त्रात या घटनेचं महत्त्व अधोरेखित होतं. ज्योतिषीय गणितं या स्थितीत झपाट्याने बदलतात. या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी लागणार आहे. सूर्यग्रहण सकाळी 7 वाजून 4 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 29 मिनिटांपर्यंत राहील. हे सूर्यग्रहण मेष रास आणि अश्विन नक्षत्रात लागणार आहे. सूर्यग्रहाणात दोन अशुभ योगांची स्थिती आहे. त्यामुळे राशीचक्रातील 12 राशींवर त्याचा परिणाम होईल. खासकरून तीन राशींची डोकेदुखी वाढणार आहे.
सूर्यग्रहणात दोन अशुभ योग
दोन दिवसांपूर्वी सूर्यदेवांनी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केला आहे. सूर्याची ही उच्च रास आहे. पण पापग्रह असलेल्या राहुसोबत युती झाल्याने ज्योतिषीय ग्रहण योग सुरु झाला आहे. या राशीत सूर्यासोबत बुध ग्रहही आहे. दुसरीकडे मंगळ ग्रह बुधाच्या रास असलेल्या मिथुन राशीत आहे.
ज्योतिषशास्त्रात मंगळ मेष राशीचा स्वामी, तर बुध मिथुन राशीचा स्वामी आहे. त्यामुळे दोन्ही ग्रह परस्पर विरोधी राशीत विराजमान होत एकमेकांसाठी ग्रहण योग तयार करत आहे.सूर्य ग्रहणाच्या दिवशी हे दोन योग जातकांना त्रासदायक ठरणार आहेत.
तीन राशींचं टेन्शन वाढणार
मेष : या राशीतच घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे लग्न भाव असल्याने दोन अशुभ योगांचा या राशीच्या जातकांना फटका बसेल. आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढतील. मानसिक स्थिती या काळात ढासळलेली राहील. काही कामं होता होता राहतील. एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे व्यवसायात मोठं नुकसान करू शकते. नोकरीच्या ठिकाणीही सहकाऱ्यांकडून त्रास होईल.
वृषभ : या राशीच्या जातकांनाही दोन अशुभ योगामुळे फटका बसेल. या राशीच्या व्यय स्थानात ही स्थिती असेल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण राहणार नाही. उलट आर्थिक स्थिती एकदम खालावेल. त्यामुळे या काळात रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कौटुंबिक वातावरण एकदम बिघडलेलं राहील. समाजात अपमानाचे अनेक प्रसंग घडतील. त्यामुळे शांत राहा आणि आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : या राशीच्या षष्टम भावात सूर्यग्रहण होणार आहे. त्यामुळे एकदमच संकटाचा डोंगर उभा राहील. इतकी सर्व संकटं अंगावर एकदम चालून आल्याने हतबल व्हाल. शेजऱ्यांसोबत भांडणं होऊ शकतात. तसेच जोडीदार किंवा पत्नीसोबत वाद होईल. कौटुंबिक वातावरण बिघडल्याने त्याचा थेट परिणाम कामावर होईल. त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घ्या. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)