Akshaya Tritiya 2023 : या वर्षी अक्षय्य तृतीयेला विवाह मुहूर्त नाही! जाणून घ्या या मागचं ज्योतिषीय कारण
Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीया हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात निसंकोच करता येते. पण यंदा विवाहासाठी हा दिवस योग्य नसेल, जाणून घ्या ज्योतिषीय कारण
मुंबई : हिंदू पंचांगानुसार अक्षय्य तृतीया हा सर्वात शुभ मुहूर्त आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हा सण साजरा केला जातो. हा दिवस कोणतंही शुभ कार्य करण्यास अनुकूल असतो. या दिवशी मुहूर्त न पाहता शुभ कार्य केलं जाऊ शकते. या दिवशी केलेलं शुभ कार्य दीर्घ काळापर्यंत टिकतं अशी मान्यता आहे. या दिवसाला अबूझ मुहूर्त संबोधलं जातं. या दिवशी महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती. तसेच गंगा स्वर्गातून पृथ्वीवर याच दिवशी आली होती.
शुभ मुहूर्त असल्याने या दिवशी मोठ्या संख्येने विवाह पार पडतात. पण यंद पंचांगात विवाहासाठी मुहुर्त दिलेला नाही. कारण या दिवशी गुरु अस्तावस्थेत आहेत. अस्थावस्थेत असताना मंगलकार्य केली जात नाही. नामकरण विधी, साखरपुडा आणि लग्नासारखी मंगलकार्य वर्जित असतात. अस्ताला गेलेला गुरु ग्रह 27 एप्रिल 2023 रोजी मेष राशीत उदीत होणार आहे.
ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रह उदीत झाल्यानंतर मंगलकार्य करावीत असं सांगण्यात आलं आहे. देवगुरु बृहस्पती 31 मार्च 2023 रोजी अस्ताला गेले आहेत. 29 एप्रिल 2023 रोजी गुरु ग्रह उदयाला येतील. म्हणजेच या वर्षी अक्षय्य तृतीयेला गुरु ग्रह अस्त असतील. म्हणजेच विवाहासाठी मुहूर्त 29 एप्रिलनंतर असेल.
पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 22 एप्रिलला सकाळी 7 वाजून 48 मिनिटांनी सुरु होईल. ही तिथी 23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजून 46 मिनिटांनी संपेल.
चला जाणून घेऊयात सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त
- 22 एप्रिल 2023 शनिवार – सकाळी 7 वाजून 48 मिनिटांपासून 23 एप्रिल 2023 सकाळी 5 वाजून 47 मिनिटांपर्यंत
- 23 एप्रिल 2023 रविवार – सकाळी 5 वाजून 47 मिनिटांपासून 7 वाजून 46 मिनिटांपर्यंत
या दिवशी चंद्र उच्च रास असलेल्या वृषभ राशीत असतील. या दिवशी कृतिका नक्षत्र असून त्याचे स्वामी सूर्यदेव आहेत. या दिवशी अमृत सिद्धी योग, रवि योग, सर्वार्थ सिद्धी योग, सौभाग्य योग, त्रिपुष्कर योग आणि आयुष्मान योग आहे. यामुळे शुभ नक्षत्र आणि योग मिळून एक महायोग तयार झाला आहे.