Vish Yog : जुलै महिन्यात कुंभ राशीत सव्वा दोन दिवसांचा विषयोग, या राशीच्या जातकांनी राहावं सावध
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरामुळे घडामोडी घडत असतात. एका राशीत एकापेक्षा जास्त ग्रह आल्याने शुभअशुभ योगाची स्थिती निर्माण होते. कुंभ राशीत विषयोगाची स्थिती निर्माण होणार आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात चंद्र हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. तर शनि हा सर्वात मंद गतीने प्रवास करणारा ग्रह आहे. तर इतर ग्रह कमी अधिक कालावधीत गोचर करत असतात. गोचर कालावधी कमी अधिक असल्याने एका राशीत एकापेक्षा जास्त ग्रह एकत्र येतात. यामुळे शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होते. कुंभ राशीत शनि अडीच वर्षांसाठी ठाण मांडून आहे. दुसरीकडे, चंद्र गोचर करत कुंभ राशीत येणार आहे. त्यामुळे विष योग तयार होणार आहे. शनि आणि चंद्राच्या युतीमुळे विषयोग तयार होतो.
सव्वा दोन दिवस विष योगाची स्थिती
6 जुलै 2023 रोजी गुरुवारी चंद्र मकर राशीतून कुंभ राशीत दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी प्रवेश करेल.कुंभ राशीत शनि असल्याने विष योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात हा योग अशुभ मानला जातो. त्यानंतर 8 जुलै 2023, शनिवारी चंद्र कुंभ राशीतून मीन राशीत दुपारी 2 वाजून 57 मिनिटांनी प्रवेश करेल आणि विषयोग संपुष्टात येईल. पण सव्वा दोन दिवसात तीन राशीच्या जातकांना सावध राहावं लागणार आहे.
तीन राशीच्या जातकांनी राहावं सावध
कर्क : शनि आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणाऱ्या अशुभ योगामुळे या राशींच्या जातकांवर नकारात्मक परिणाम दिसून येईल. शनिच्या अडीचकी दरम्यान हा योग अडचणीत वाढ करेल. या काळात जातकाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. या काळात केलेली गुंतवणूक तोट्याची ठरू शकते. खासकरून या कालावधीत लांबचा प्रवास टाळा. वाहन चालवताना काळजी घ्या.
कन्या : विषयोगामुळे या राशीच्या जातकांना सव्वा दोन दिवसांचा कालावधी अडचणीचा जाईल. काही कारणामुळे वाद होऊ शकतात. घरच्यांशी किंवा शेजाऱ्यांशी भांडणं होऊ शकतात. त्यामुळे या काळात वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. न्यायालयाची पायरी या काळात चढावी लागू शकते. विनाकारण पैसा खर्च होईल.
मीन : विषयोगाच्या कालावधीत विनाकारण वाद घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाद होईल असं वागू नका. या काळात चोरीसारखी घटना घडू शकते. यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे. नवीन कामाची सुरुवात सव्वा दोन दिवसात न केली तर बरं होईल. शनि साडेसातीचा पहिला टप्पा असल्याने आरोग्यविषयक तक्रार डोकं वर काढू शकते. एकंदरीत काळजी घेणं गरजेचं आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)