मुंबई : केंद्रातील मोदी सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री (Minister) स्मृती इराणी (Smriti Irani) यांचा आज (23 मार्च) वाढदिवस. स्मृती इराणी हे नाव राजकीय वर्तुळात लोकप्रिय होण्याआधी छोट्या पडद्यावरून आधीच घरोघरी प्रसिद्ध झालेले होते. त्या एकेकाळी लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री (Actress) होत्या. त्यावेळी ‘घर सांभाळणारी सून’ अशी प्रतिमा त्यांची प्रत्येक घराच्या मनात ठसली होती. स्मृती झुबिन इराणी यांचा जन्म 23 मार्च 1976 रोजी दिल्लीत झाला. टीव्ही सीरियल ‘आतिश’मधून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे त्यांनी ‘हम हैं कल, आज और कल’, ‘कविता’ आणि ‘क्योंकी सांस भी कभी बहू थी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. (From waitress in Delhi hotel to Union Minister in Parliament; The inspiring journey of Smriti Irani)
स्मृती इराणी यांनी होली चाइल्ड ऑक्झिलियम स्कूलमधून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लर्निंगमध्ये प्रवेश घेतला. वडिलांना मदत करण्यासाठी आणि काही पैसे कमवण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणूनही काम केले. यादरम्यान कोणीतरी त्यांना मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी दिल्लीहून मायानगरी मुंबई गाठली. 1998 मध्ये त्यांनी मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्वतःचे स्थान निर्माण केले. त्याच वर्षी मिका सिंगच्या ‘सावन में लग गई आग’ या अल्बममधील ‘बोलियान’ गाण्यात त्यांनी परफॉर्म केला. एकता कपूरच्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या शोमुळे त्या देशातील घराघरात पोहोचल्या. यापूर्वी एकता कपूरच्या टीमने त्यांना या भूमिकेसाठी नकार दिला होता. मात्र नंतर स्मृती इराणी यांच्या दमदार अभिनयामुळे ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. स्मृती इराणी यांनी ‘विरुद्ध’, ‘तीन बहुरानी’ आणि ‘एक थी नायिका’ यांसारख्या अनेक मालिकांमध्येही काम केले.
स्मृती इराणी यांनी 2003 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पुढच्याच वर्षी त्यांना महाराष्ट्राच्या ‘युथ विंग’च्या उपाध्यक्ष बनवण्यात आले. 2010 मध्ये त्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि महिला विंगच्या अध्यक्षा झाल्या. 2014 मध्ये उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधींविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्यावेळी त्या पराभूत झाल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वतःच्या विजयाचा चमत्कार करून दाखवला. त्या निवडणुकीत त्यांनी राहुल गांधींचा 38000 मतांनी पराभव केला. स्मृती इराणी यांनी याआधी मोदी सरकारमध्ये मनुष्यबळ व विकास मंत्री म्हणून काम केले आहे. सध्या त्यांच्याकडे केंद्रीय वस्त्रोद्योग आणि महिला-बाल विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे.
स्मृती इराणी यांनी 2001 मध्ये पारशी उद्योजक झुबिन इराणी यांच्याशी लग्न केले. ऑक्टोबर 2001 मध्ये त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यांच्या या मुलाचे नाव जोहर आहे. दोन वर्षांनंतर म्हणजेच सप्टेंबर 2003 मध्ये त्यांना जोइशच्या रूपात कन्यारत्न झाले. (From waitress in Delhi hotel to Union Minister in Parliament; The inspiring journey of Smriti Irani)
इतर बातम्या
World Water Day: जल है तो कल है..! जागतिक जल दिनाचा नेमका उद्देश काय?
MIMला विरोध, पण शिवसेनेची मुस्लिम लीगसह सेक्युलर पक्षांशीही अनेकदा युती, इतिहास काय सांगतो?