दहावीचं परीक्षा केंद्र आणि आठवणी…
वारणावतीच्या केंद्रावर भागातली सगळी पोरं परीक्षेला तिथं असायची. ज्या विद्यार्थ्यांसोबत पालक असायचे असे विद्यार्थी एसटीने वाराणावती केंद्रावर जायचे. नाहीतर इतर विद्यार्थी वडापच्या गाडीने तिथं जायचे.
सांगली : शिराळा तालुक्यातलं वारणावती (Warnawati) केंद्र दहावीच्या परीक्षेसाठी (10th class) अगदी फेमस होतं. दहावीची परीक्षा जवळ आली की अनेकांना कापरं भरायचं. दहावीची परीक्षा दुसऱ्या ठिकाणी असल्यामुळे अनेकांना दुनियाचं टेन्शन असायचं. आपला मुलगा किंवा मुलगी दहावीला असल्यामुळं पालक शिक्षक आणि शिपाई काकांच्या भेटी घ्यायचे. आमच्या पोराला मदत करा, पोरांच्या टेन्शनपेक्षा पालकांना अधिक टेन्शन असायचं. इंग्रजी किंवा गणिताच्या पेपरला कॉड येऊ नये, म्हणून अनेकांनी वाटेतल्या देवाला नवसं सुध्दा केलंय. पण त्या काळात इंग्रजी किंवा गणिताच्या पेपरला (Algebra and english paper) कॉड असायचं. (आता हे कॉड म्हणजे काय असा प्रश्न नेहमी पडायचा, ग्रामीण भागातल्या लोकांना तो शब्द म्हणता येत नसल्यामुळे Squad चा कॉड झाला होता.) आज सुध्दा त्यावेळी शिकलेली पोरं आमच्या काळात कॉड यायची असं म्हणतात.
ग्रामीण भागात शेतीची काम करणारं पोरगं चांगलं असतं. जो शेतीची काम करीत नाही, त्याचं अजिबात कौतुक नसतं. ज्याला शेतीची कामं येतात, त्याला आजही चांगलं म्हटलं जातं. कारण तो आईवडिलांच्या कामाला मदत करीत असतो. त्या काळात वारणावती केंद्रात दहावी पास झालेले आज अधिकारी सुध्दा आहेत. त्याबरोबर चांगल्या हुद्यावर सुध्दा आहेत.
वारणावतीच्या केंद्रावर भागातली सगळी पोरं परीक्षेला तिथं असायची. ज्या विद्यार्थ्यांसोबत पालक असायचे असे विद्यार्थी एसटीने वाराणावती केंद्रावर जायचे. नाहीतर इतर विद्यार्थी वडापच्या गाडीने तिथं जायचे. परीक्षा कमी आणि हिरोगिरी अधिक असायची. वडापची गाडी म्हणजे कंमाडर गाडी त्या गाडीत हिशोबाच्या बाहेर रेमटून पोरं बसवायची. त्यानंतर मागच्या बाजूला उभा राहिलेली पोरं वेगळी असायची. टप्पावर बसलेली पोरं वेगळी असायची. त्या काळात परीक्षा काही विद्यार्थ्यांसाठी सिरीयस असायची.
पोरांच्या हातात एकदा पेपर आला की, आपल्या विषयात सगळी पोरं पास व्हावी यासाठी मास्तर तयारीनिशी जात असतं. परीक्षा पोरांची होती की, मास्तरांची असं वाटायचं. प्रत्यके पोरगं पास होईल येवढं सगळं पुरवलं जात होतं. दुसऱ्या दिवशी वारावती केंद्रावर पोत्यानं कॉपी सापडली अशी बातमी पेपर असायची. त्यावेळी तिथं एखादं पथकं आलं तरी पोरांची आणि माणसांची भंबेरी उडायची. एकमेकांच्या अंगावर कॉपी फेकली जायची. ज्याच्या बाजूला कॉपी सापडायची त्याचा निकाल तिथचं लागलेला असायचा.
कॉपी देताना एखादा व्यक्ती सापडला, तर पोलिस त्याला त्यांच्या हिशोबाने प्रसाद द्यायचे. पोलिस गाडी कायम फिरत असल्यामुळे कॉपी देणारे सुध्दावारा हुशारी बाळगायचे. शहरात पोरगं पास होईना किंवा एखाद्या विद्यार्थ्याचे दोन तीन विषय राहिले आहेत. त्यांना त्याचे आई-वडिल त्याला गावाकडच्या शाळेत घालायचे. मग वारणावती केंद्रावर पास व्हायचा. दहावीचे सगळे पेपर झाल्यावर शेजारी असलेलं चांदोली धरण पाहायला विद्यार्थ्यांची अधिक गर्दी असायची.
एका मित्राने वरती लिहिलेली सगळी माहिती सांगितली आहे. “त्याच्याकडे कॉपी होती, नेमकं इतिहासाच्या पेपरला भरारी पथक धडकलं. अचानक काय करावं असा प्रश्न त्याच्या मनात रेंगाळत राहिला. पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी सुरु केली. पहिली लाईन तपासली, त्यावेळी हा तिसऱ्या लाईनीत होता. हा अचानक म्हणाला, मला पहिलं तपासा माझ्याकडे वेळ कमी आहे. मला पेपर अजून लिहायचा आहे.” त्यावेळी भरारी पथकाने त्याची तपासणी केली नाही, इतरांची तपासणी केली आणि तो त्यातून बजावला आणि इंग्रजी विषयात नापास झाला. २००५ ला वारणावती क्रेंद कॉपीमुक्त केलं. त्यावेळी आमच्या गावच्या शाळेतील आठ मुलं पास झाली होती. २००६ आम्ही दहावीला होतो, त्यावेळी आमच्या गावातचं परीक्षा केंद्र झालं.