Special story | आजच्या भाषेत सावित्रीबाई फुले याच पहिल्या ‘प्लेग योद्धा’: हरी नरके
आज जसं कोरोनाचं संकट आहे. तसंच संकट 1897मध्ये प्लेगचं होतं. पण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या एकट्याच या साथीविरुद्ध लढत होत्या. (Savitribai Phule Hari Narke)
मुंबई: आज जसं कोरोनाचं संकट आहे. तसंच संकट 1897मध्ये प्लेगचं होतं. त्या काळात घरदार, गाव सोडून अनेक लोक पुण्याबाहेर पडत होते. नेते मंडळींनीही या साथीला घाबरून पुणे सोडलं होतं. पण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या एकट्याच या साथीविरुद्ध लढत होत्या. आजच्या परिभाषेत सांगायचं म्हणजे त्या खऱ्या अर्थाने पहिल्या प्लेग योद्धाच होत्या, असं प्रसिद्ध विचारवंत प्रा. हरी नरके यांनी सांगितलं.
सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्ताने आजचं कोरोनाचं संकट आणि 1897मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीचं विश्लेषण करताना हरी नरके यांनी हे भाष्य केलं. 1897मध्ये जेव्हा प्लेगची साथ आली, त्यावेळी आता सारखीच परिस्थिती होती. त्यावेळी लोकांना हा आजार नवीन होता. त्यावेळी शिक्षणाचं प्रमाण केवळ अडीच टक्के होते. अंधश्रद्धेचा मोठा पगडा होता. त्यावेळी अशी महामारी आली तर तो देवीचा कोप समजला जायचा. वैद्यकीय व्यवस्था अत्यंत कमकुवत होत्या. त्याकाळी पुण्याची लोकसंख्या 1 लाख होती आणि या साथीने रोज 800 ते 900 लोकांचा पुण्यात मृत्यू होत होता, असं नरके म्हणाले.
मुलालाही रुग्णसेवेसाठी पुण्यात बोलावलं
प्लेगची साथ आधी मुंबईत आली. त्यावेळी भायखळ्यात प्लेगमुळे आजारी पडणाऱ्या कामगारांची प्रसिद्ध कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी सेवा केली. त्यामुळे त्यांनाही प्लेग झाला आणि 9 फेब्रुवारी 1897ला त्यांचा मृत्यू झाला. एव्हाना पुण्यातही या साथीने हातपाय पसरले होते. त्यामुळे सावित्रीबाईंनी त्यांच्या डॉक्टर असलेल्या दत्तक मुलाला, यशवंतला पुण्यात बोलावून घेतलं. यशवंत हे मिलिट्रीत डॉक्टर म्हणून कार्यरत होते. पण सावित्रीबाईने यशवंतांना पुण्यात बोलावून घेतलं आणि प्लेगच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हडपसरला दवाखाना सुरू केला होता. हा आजार जीवघेणा असल्याचं माहीत असूनही त्यांनी मुलाला पुण्यात बोलावून घेतलं होतं. एव्हाना निम्मं पुणं खाली झालं होतं. अनेक नेतेही जीव वाचवण्यासाठी पुणे सोडून गेले होते. यशवंत यांनी दवाखाना सुरू केल्यानंतर सावित्रीबाई घरोघरी जाऊन रुग्णांना दवाखान्यात घेऊन येत. विशेषत: दलित, वंचित आणि गोरगरीबांना त्या दवाखान्यात आणून उपचार करायच्या. स्वत: पायपीट करायच्या. त्यावेळी ना रुग्णवाहिका होत्या, ना स्ट्रेचर. पण त्यांनी जीवाची पर्वा न करता हे काम सुरूच ठेवलं होतं, असं ते म्हणाले.
प्लेगमुळेच सावित्रीबाईंचा मृत्यू
प्लेगच्या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी इंग्रजांनी रँड नावाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. त्याने पुण्यात स्वच्छतेवर भर दिला होता. आज जसं सॅनिटाझेशन केलं जातं, तसं काम त्यानं सुरू केलं होतं. पुढे तो अत्याचार करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आणि त्याचा खून झाला. प्लेगची साथ एव्हढी भयंकर होती की रँडला मारणारेही नंतर जीव वाचवण्यासाठी शहर आणि गाव सोडून निघून गेले होते. त्यावेळी मात्र सावित्रीबाईच शूरपणाने या साथीशी लढत होत्या. त्यांनी पांडुरंग बाबाजी गायकवाड या शेवटच्या रुग्णचा जीव वाचवला. महार समाजातील हा मुलगा अवघा ११ वर्षाचा होता. यशवंत यांच्या दावाखान्यापासून आठ किलोमीटरवर असलेल्या मुंढवा येथे हा मुलगा होता. त्याला सावित्रीबाईने पाठिवर टाकून पायी चालत दवाखान्यात आणून त्याच्यावर उपचार केले होते, असं त्यांनी सांगितलं. प्लेगच्या साथीत अनेक रुग्णांवर उपचार करत असताना सावित्रीबाईंनाही या रोगाची लागण झाली आणि त्यांचा 10 मार्च 1897ला मृत्यू झाला. 1848चा पहिली शाळा काढल्यापासून ते 10 मार्च 1897 पर्यंत सावित्रीबाई सलग 50 वर्षे सामाजिक कार्यात होत्या. त्या सलग काम करत होत्या. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे त्या प्लेग योद्धाच होत्या, असं ते म्हणाले.
कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेची पोलखोल
आज आपली आरोग्य व्यवस्था सुधारलेली आहे. पाश्चात्य देशाची आरोग्य व्यवस्था आपल्यापेक्षा चांगली असल्याचं आपल्याला वाटायचं. पण कोरोनाने पाश्चात्य देशाची आरोग्य व्यवस्थाही उघडी पडली आहे. प्लेगचं संकट मोठं होतं, पण या संकटाने जगाला वेढलं नव्हतं. आज कोरोनानं जगाला वेढलं आहे. त्याचं कारण संपर्काची साधनं मोठी आहेत. त्याचा जसा फायदा आहे, तास तोटाही आहेच, असं नरके म्हणाले.
‘या’ कोरोना योद्ध्यांचं काम सावित्रीबाईंसारखं
आज आपले डॉक्टर, नर्स हे वैद्यकीय कर्मचारी, आरोग्य व शासकीय सेवेतील कर्मचारी आणि कोरोना रुग्णांचे अंत्यविधी करणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी सावित्रीबाईंसारखंच जीवावर उदार होऊन काम करत आहेत. अंत्यविधी करणारे हे चतुर्थश्रेणी कामगार नेहमीच दुर्लक्षित असतात. पण आज तेच लोक तुमच्या जवळच्या नातेवाईकांचे अंत्यविधी जीवावर उदार होऊन करत आहेत. त्यामुळे पुढच्या काळात तरी या कर्मचाऱ्यांबद्दल समाजाने आस्था बाळगली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘मृत्युशी मैत्री’
पिंपरी-चिंचवडला कांबळे नावाचे एक चतुर्थश्रेणी कामगार आहेत. ते कोरोना रुग्णांचे अंत्यविधी करतात. त्यांनी त्यांच्या मानेवरच ‘मृत्युशी मैत्री’ असं लिहिलं आहे. कोरोनामुळे आपली कधीही मृत्यूशी गाठ पडू शकते हे त्यांना माहीत आहे, खरे तर या लोकांच्या माध्यमातूनच सावित्रीबाई आजही कार्यरत आहेत, असंही ते म्हणाले.