Special Story : गडकरी! मोदींच्या काळातही ‘आवाज’ असणारा नेता, कामही एकदम कडक

गडकरी जे बोलतात ते करुन दाखवतात, अशीच त्यांची ख्याती जनमानसात पसरलेली आहे. त्याला कारणही त्यांचं काम आणि कामकाजाचा 'गडकरी पॅटर्न' आहे.

Special Story : गडकरी! मोदींच्या काळातही 'आवाज' असणारा नेता, कामही एकदम कडक
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 7:28 AM

मुंबई : प्रचारसभा असो की कुठली सार्वजनिक सभा, लाखो श्रोत्यांच्या मनावर छाप सोडणारं वक्तृत्व, सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमातील कोपरखळ्या आणि हास्याचे फवारे, कुठल्या उद्घाटन समारंभात आकडेवारींची केलेली उधळण किंवा एखाद्या सभेत अधिकाऱ्यांना धमकीवजा शब्दात दिलेला इशारा, हे चित्र तुम्हाला एकाच राजकीय व्यक्तीमध्ये पाहायला मिळतं, ते म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी. गडकरी यांच्या कामाचा धडाका तर पक्ष कार्यकर्त्यांसह देशातील सर्वच नागरिकांना माहिती आहे. गडकरी जे बोलतात ते करुन दाखवतात, अशीच त्यांची ख्याती जनमानसात पसरलेली आहे. त्याला कारणही त्यांचं काम आणि कामकाजाचा ‘गडकरी पॅटर्न’ आहे.(Union Minister Nitin Gadkari’s daily routine and work)

नितीन गडकरी यांच्या कामाचा धडाका पाहून हा माणूस काम कशापद्धतीने करत असेल? या माणसाला स्वत:साठी वेळ असतो का? कुटुंबीय, नातवंडं यांच्यासाठी हा माणूस वेळ काढतो का? असा प्रश्न गावच्या पारावर बसलेले अनेक लोक पानाला चुना लावत, सुपारी तोंडात टाकत एकमेकांना विचारत असतात. त्यातील एक फटकेवाले आजोबा म्हणतात सध्या मोदीच्या काळात गडकरी साहेबांच्या खात्याचं कामच लय पाहायला मिळतंय. आमच्या काळात कशाला, गेल्या सात-आठ वर्षापूर्वी आम्हाला दगड-गोट्यातून, पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून वाट काढत तालुक्याला जावं लागायचं. पण या माणसानं आता मऊसुरुक रस्ता बनविला अन् आम्हासारख्याला तालुका जवळ केला. गावातील पारावरच्या या गप्पा ऐकून नितीन गडकरी यांचं कामच किती बोलकं आहे, हे दिसून येतं.

कोरोनापूर्वी आणि कोरोना काळातील कामाचं रुटीन

गडकरी यांच्या दिनक्रमावर नजर टाकायची झाली तर कोरोनापूर्वी आणि कोरोनाकाळातील गडकरींच्या कामात काही बदल झाला आहे. कोरोना काळात गडकरी यांना दैनंदिन कार्यक्रमात काहीसा बदल करावा लागला. त्यानुसार गडकरी रोज सकाळी 6 वाजता उठतात. सकाळची सर्व कामं आटोपून पेपर वाचतात. हल्ली त्यांनी स्वत:च्या तब्येतीकडे काहीसं लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रोज सकाळी त्यांनी 1 तास योगाभ्यास सुरु केला आहे. त्यानंतर 9 वाजेपासून ते लोकांना भेटण्यास आणि त्यांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात करतात. या दरम्यान ब्रेकफास्टची वेळ झाल्यावर उपस्थित असलेल्या लोकांसोबत ते ब्रेकफास्ट करतात. पुढे सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत वेबिनार आणि विविध कार्यालय, अधिकारी आदींशी मिटिंग पार पडते. त्यानंतर जेवण करुन गडकरी तासभर विश्रांती घेतात. पुन्हा दुपारी 4 वाजल्यापासून सुरु होणारे वेबिनार आणि मिटिंग्स रात्री 12 वाजेपर्यंत चालतात.

कोरोना काळापूर्वीचं रुटीन पाहायचं झालं तर सोमवार ते शनिवारी गडकरी दिल्लीत असायचे. त्यावेळी सकाळची सर्व महत्वाची कामं आटोपून ते 11 वाजता कार्यालयात हजर राहायचे. दुपारी जेवण करुन पुन्हा विविध प्रकरणाच्या मिटिंग सुरु व्हायच्या. दौरे, प्रवास, उद्घाटन समारंभ आणि लोकांचा राबता यात गडकरी गुंतून जातात. आठवड्याचा प्रत्येक शनिवार, रविवार ते नागपुरात असतात. तिथे आपल्या मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी रविवारी जनता दरबार भरवला जातो. यावेळी मतदारसंघातील आणि मतदारसंघाबाहेरील आलेल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना गडकरी भेटतात. त्यांच्या समस्या, अडचणी समजून घेत त्यावर अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देतात. महत्वाची बाब म्हणजे सर्वसामान्य लोकांना गडकरी यांच्या भेटीसाठी अपॉईंटमेन्टची गरज भासत नाही.

‘दूध का दूध और पानी का पानी’

नितीन गडकरी आपल्या मंत्रालयाच्या कारभारासह अन्य मंत्रालयातील लोकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सदैव तत्पर असतात. कोरोना काळात सरकारच्या नियमावलीनुसार त्यांच्या दौऱ्यांवर बंधनं आली असली तरी कोरोना त्यांचं काम रोखून शकला नाही. सध्या ऑनलाईन मिटिंगच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्यात एका राज्यासोबत त्यांची मिटिंग पार पडते. या ऑनलाईन मिटिंगमध्ये त्या राज्याचे मुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, खासदार, आमदार, अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर कंपनीचे अधिकारी, बँक अधिकारी अशा शेकडो लोकांच्या उपस्थितीत बैठक पार पडते. या बैठकीच्या माध्यमातून गडकरी जागेवरच ‘दूध का दूध और पानी का पानी’ करतात आणि हीच त्यांच्या कामाची खासियत आहे. इतकच नाही तर जवळपास प्रत्येक कामाबाबत गडकरी हे प्रत्येक महिन्याला एक आढावा बैठकही घेतात.

सेवाव्रती गडकरी

नितीन गडकरी यांचं वर्षाचे 365 दिवस काम सुरु असतं. “आपण लोकांवर उपकार करत नाही. लोकांची कामं करण्यासाठीच आपण या पदावर आहोत. लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे. त्यांची अडचण असल्यामुळेच ते आपल्याकडे आलेले असतात. अशावेळी त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांनी अडचण सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहीजे,” असं गडकरी सांगतात. गडकरी आपल्या कामाप्रति जितके तत्पर आणि कार्यरत असतात, त्या प्रमाणात ते स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीत. अशावेळी त्यांच्या ऑफिसकडूनच एक नियमावली ठरवून घेण्यात आली आहे. जेवणानंतर गडकरी यांना एक तासभर आराम करायला लावला जातो. त्यावेळी लोकांच्या भेटीगाठी किंवा अन्य कुठली कामं त्यांच्या कार्यालयाकडून बाजूला ठेवली जातात.

एकपाठी गडकरी

नितीन गडकरी हे एकपाठी आहेत. एकदा का कुठल्या फाईलवर त्यांनी नजर फिरवली की त्यातील माहिती आणि आकडेवारी त्यांच्या डोक्यात कायम राहते. अनेकदा अनेक अधिकारी एखादी गोष्ट लाईटली घेतात. पण गडकरी संबंधित अधिकाऱ्याला 4-5 महिन्यांपूर्वी सांगितली गेलेली एखाद्या प्रकल्पाची किंमत किंवा माहिती लक्षात आणून देतात. कामाच्या रामरगाड्यात गडकरी यांना वाचनासाठी वेळ मिळत नाही. पण एखाद्या फाईलवर एकदा का नजर फिरवली ते बरोबर लक्षात ठेवतात. कामचुकार अधिकाऱ्यांसाठी हा एक मेसेज आहे. प्रत्येक मंत्रालयात काम करत असताना गोष्टी सोप्या करुन ते काम तडीस लावण्याची गडकरी यांची पद्धत आहे. ते कुठल्याही प्रकारे कन्फ्यूज नसतात.

प्रश्न अनेक, उत्तर गडकरी

रस्ते वाहतूक आणि महामार्ग या आपल्या खात्यासह नितीन गडकरी यांनी कृषी, पाणी, कचरा आदी विषयांमध्ये अनेक कामं केली आहेत. गडकरी हे मल्टिटास्किंग व्यक्तीमत्व आहे. अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनही ते काम करतात. एखाद्या कामासाठी प्रोटोकॉल बाजूला ठेवून खालच्या अधिकाऱ्याला फोन करुन बोलण्यासही त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. काम करण्याची आणि ते काम तडीस नेण्याची त्यांची तळमळ असते. कामाबाबत व्यक्ती छोटा की मोठा हे ते पाहत नाहीत. एखादं काम करण्यासाठी तो काम घेऊन आलेला खासदार, आमदार किंवा कोणताही भाग त्यांना वर्ज्य नाही. प्रत्येक पक्ष, प्रत्येक विभाग, मतदारसंघातील कामासाठी गडकरींचा पुढाकार ठरलेला असतो. त्यामुळे प्रत्येक पक्षाचा खासदार त्यांच्याशी व्यक्तीगतरित्या कनेक्ट आहे.(Union Minister Nitin Gadkari’s daily routine and work)

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गेंचा किस्सा

राजकारणात महाराष्ट्राची एक संस्कृती राहिलेली आहे आणि ती आजही जोपासली जाते. विरोधी पक्षातील एखाद्या ज्येष्ठ नेत्याला आपलं काम करुन घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याकडे स्वत:हून कधीच जावं लागत नाही. नितीन गडकरी हे देखील याच संस्कृतीचे पाईक आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधी बाकांवर बसली. तेव्हा मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते होते. खर्गे यांचं गडकरींकडे काही काम होतं. त्यावेळी खर्गेंनी गडकरी यांच्या कार्यालयात फोन करुन आपण गडकरींच्या भेटीसाठी येत असल्याचं सांगितलं. त्यावेळी गडकरी त्याक्षणी स्वत: उठून खर्गे यांच्या भेटीला गेले आणि त्यांचं काम जाणून घेतलं. त्यावेळी काँग्रेसचे नेते चांगलेच अवाक झाले. आता मल्लिकार्जुन खर्गे गडकरीच्या कामाची पद्धत लक्षात ठेवून आहेत. त्याचबरोबर कर्नाटकातही हा किस्सा चांगलाच प्रचलित आहे.

कला, क्रीडा क्षेत्राची आवड आणि गडकरींचा खवय्येपणा

नागपुरातील खासदार महोत्सवाच्या माध्यमातून कलासक्त गडकरी दिसून येतात. या महोत्सवात क्रिकेट, खो-खो पासून अनेक स्पर्धांचंही आयोजन केलं जातं. तसंच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही या महोत्सवात पार पडतात. कृषी क्षेत्रात असलेली आवड लक्षात घेता गडकरी नागपुरात कृषी महोत्सवाचंही आयोजन करतात. या महोत्सवात संपूर्ण राज्यासह देशातील विविध ठिकाणचे कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग पाहायला मिळतात.

खवय्येपणा हा नितीन गडकरी यांचा विक पॉईंट आहे. दिल्लीत त्यांच्या कार्यालयात गेलेला पत्रकार, अधिकारी, सामान्य माणून चहा आणि पोहे घेतल्याशिवाय परत येत नाही. इतकच नाही तर जेवणाच्या वेळात आलेला प्रत्येक माणून डायनिंग टेबलवर त्यांच्यासोबत बसून विविध पदार्थांच चव चाखल्याशिवाय माघारी फिरत नाही. गडकरींना खाण्यात चमचमीत पदार्थ खायला जास्त आवडतात. जेवण बनवण्यासाठी गडकरींच्या दिल्लीतील कार्यालयात एक खास स्वयंपाकी नेमण्यात आला आहे.

कौटुंबिक गडकरी

कामाच्या रामरगाड्यातून गडकरींना स्वत:साठी आणि कुटुंबासाठी खूप कमी वेळ मिळतो. पण नागपुरात असल्यावर गडकरी कधीकधी आपल्या नातवांसोबत रमलेले पाहायला मिळतात. नातवांमध्ये खेळताना गडकरीही त्यांचेच होऊन गेलेले अनेकांनी पाहिलं आहे. नागपुरातील रस्त्यांवर जिलेबी किंवा एखाद्या पदार्थाची चव चाखतानाचे गडकरीही नागपूरकरांनी अनेकदा पाहिले आहेत. दिवाळी, गणेशोत्सव काळात गडकरी नागपुरातील घरात देवपूजा करतानाही तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं असेल.

विकासकामांचा ‘गडकरी पॅटर्न’

नितीन गडकरी यांचं रस्ते, कृषी, पाणी आदी क्षेत्रातील काम आणि कामाची पद्धत सुपरिचित आहे. त्यातील काही उदाहरणं पाहायची झाली तर

जलक्रांतीचा ‘बुलडाणा पॅटर्न’

बुलडाणा हा पश्चिम विदर्भातील अतिदुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून अतिदुष्काळी असलेला बुलडाणा आता जलसंपन्नेतेकडं वेगानं वाटचाल करत आहे. त्यासाठी कारणीभूत ठरला तो गडकरींच्या संकल्पनेतील जलक्रांतीचा अभिनव असा ‘बुलडाणा पॅटर्न’. महामार्गाच्या बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात माती, दगड, मुरुम यांचा भराव टाकावा लागतो. तो भराव टाकण्यासाठी कंत्राटदारांना माती, मुरुम आदी अन्य ठिकाणांहून विकत आणावे लागतात. मात्र, नितीन गडकरी यांनी महामार्गालगत कोरडे पडलेले, पाण्याची क्षमता कमी झालेले तलाव, बंधारे, नद्या-नाले आदींमधून रस्त्यांसाठी लागणारी माती, मुरुम काढण्याचा निर्णय घेतला. तलाव, बंधारे, नाल्यांचं खोलीकरण करुन त्यातून निघणारी माती, मुरुम महामार्गाच्या भरावासाठी वापरण्यात आलं. त्यामुळे सरकारचा वाहतूक खर्च आणि वेळही वाचला. तर दुसरीकडे तलाव, नद्या-नाल्यांचं खोलीकरण झालं. त्यामुळे साठलेला गाळ नाहीसा झाला. त्यांची पाण्याची क्षमता वाढली. त्याचबरोबर नैसर्गिक झरे जिवंत झाल्याने तलाव, नाले पुन्हा एकदा भरु लागले. आसपासच्या जमिनीत पाणी झिरपण्यास सुरुवात झाली आणि परिसरातील भूजल पातळी वाढली. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती पुन्हा बहरु लागली आहे.

नागपूर मेट्रो भंडारा, वर्धा, रामटेकपर्यंत

नागपूर शहरासह पूर्व विदर्भाच्या विकासासाठी नितीन गडकरी यांनी नागपूर मेट्रोचा विस्तार भंडारा, वर्धा, रामटेकपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जवळच्या शहरांना पॅसेंजर ट्रेनऐवजी वातानुकूलित मेट्रोनं जोडण्याच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळानं नुकतीच मंजुरी दिली आहे. चार डब्यांची ही मेर्टो त्याच रुळांवर, त्याच स्टेशनवरुन धावेल. या मेट्रो प्रवासाचा खर्चही एसटी बस प्रवासा एवढाच असणार आहे. महत्वाही बाब म्हणजे यातील एक डबा शेती उत्पादनासाठी ठेवला जाणार आहे. त्यामुळे या शहरांतील लोकांचा वेळ तर वाचेलच पण त्यांचा विकास होण्यासही मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पाच्या मान्यतेसाठी गडकरींनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल, रेल्वे मंत्रालयाची मंजूरी मिळवून घेतली. यासह विकासाच्या अनेक कल्पना गडकरींच्या डोक्यात कायम असतात.

टॉयलेटच्या पाण्यातून पैसा उभारला

नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरातील सांडपाण्यातून मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध झाला आहे. हे पाणी विट उद्योगाला देण्यात आलं. इतकच नाही तर या पाण्यातून मिथेन वायू बाजूला काढून Co2 काढून शहरातील गाड्यांना तो गॅस पुरवला जाणार आहे.

अटल टनल योजनेत सरकारचे 4 हजार कोटी वाचवले

नितीन गडकरी यांची दूरदृष्टी अनेक विकासकामांमध्ये दिसून येते. जगातील सर्वात लांब टनेल म्हणून अटल टनेलची नोंद झाली आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या टनेलचं उद्घाटन केलं. या टनेलमुळे मनाली आणि लेहमधील अंतर जवळपास 46 किलोमीटरने कमी झालं आहे. या टनेलमुळे मनाली आणि लाहोल स्पीति हे वर्षभर जोडले गेलेले राहणार आहेत. या योजनेत गडकरी यांनी अनेक कॉन्ट्रॅक्टरचा अभ्यास करुन आणि सुयोग्य कॉन्ट्रॅक्टर नेमून सरकारचे तब्बल 4 हजार कोटी रुपये वाचवले आहेत.

गडकरी यांच्या हा कामाचा धडाका, त्यांचा अभ्यास, विविध क्षेत्राची माहिती, अनेक क्षेत्रातील समस्यांची सोडवणूक करण्याची हातोटी, अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून योग्य काम करुन घेण्याची पद्धत, एखाद्या लोकप्रतिनिधीपासून सर्वसामान्य नागरिकांचं काम तेवढ्याच आपुलकीनं करण्याचा मानस आणि 24 तास राजकारणात, आपल्याच विश्वास कार्यरत असलेले गडकरी कुटुंबासह जनतेचेही आदर्श आणि लाडके नेते म्हणवतात.

इतर स्पेशल स्टोरी : 

Special Story | आईसोबत भाजीविक्री, नंतर शिक्षक ते अधिकारी, सुदाम महाजन यांचा थक्क करणारा प्रवास !

Special Story: खलिस्तान चळवळ काय आहे? सुरुवात कुठून? भारताची डोकेदुखी का?; वाचा स्पेशल रिपोर्ट

Union Minister Nitin Gadkari’s daily routine and work

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.