Aalandi : उद्या आळंदी बंदची हाक, देवस्थानच्या विश्वस्त पदावरून स्थानिकांना डावल्याने
विश्वस्त मंडळात स्थानिक ग्रामस्थांनाही स्थान देण्यात यावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यासंबंधी ग्रामस्थांकडून संबंधीत प्रशासनाला पत्रव्यव्हार देखील केला होता, मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तत्कालीन विश्वस्तांच्या शिफारशीवर आणखी नव्या तीघांना विश्वस्त मंडळात स्थान देण्यात आल्याने ग्रामस्थांच्या नाराजीचा सूर अधिकच तिव्र झाला आहे.
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा (Dhyaneshwar Maharaj) आणि कार्तिकी एकादशी यात्रा सोहळा मंगळवारी पासून सुरु होत आहे. शनिवार कार्तिकी एकादशी तर सोमवार संजीवन समाधी सोहळा आहे. अशातच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत विश्वस्त म्हणून स्थानिकांनाही स्थान मिळावे यासाठी आळंदीकर ग्रामस्थांनी बैठक घेऊन मंगळवारी आळंदी बंद पुकारला आहे. आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांची निवड करण्यात यावी यासाठी संबंधित प्रशासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आला होता. तरी देखील संबंधित प्रशासनाने स्थानिकांचा विचार न करता आळंदी देवस्थानवर तत्कालीन विश्वस्तांच्या शिफारशी वर नवीन तीन विश्वस्तांची नेमणुक केली आहे.
तसेच तत्कालीन विश्वस्तांना सुध्दा मार्च महिन्यापर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. याबाबत समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने या गोष्टीचा तीव्र निषेध करण्यात आला. प्रशासनाने याकडे योग्य लक्ष न दिल्यास कार्तिकी वारीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी आळंदी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
ग्रामस्थांची मागणी काय आहे?
आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महारांजांची संजीवन समाधी आहे. समाधीस्थळी भव्य मंदिर आहे. या मंदिराच्या विश्वस्त समितीत काही ठरावीक मर्जीतील लोकांचीच नावे असतात असा ग्रामस्थांचा आरोप आहे. विश्वस्त मंडळात स्थानिक ग्रामस्थांना डावलण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
विश्वस्त मंडळात स्थानिक ग्रामस्थांनाही स्थान देण्यात यावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यासंबंधी ग्रामस्थांकडून संबंधीत प्रशासनाला पत्रव्यव्हार देखील केला होता, मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तत्कालीन विश्वस्तांच्या शिफारशीवर आणखी नव्या तीघांना विश्वस्त मंडळात स्थान देण्यात आल्याने ग्रामस्थांच्या नाराजीचा सूर अधिकच तिव्र झाला आहे. उद्या मंगळवारी संबंधीत मागणीसाठी ग्रामस्थांनी एकमत करून आळंदी बंद पुकारला आहे.
या बंदला स्थानिक दुकानदारांचाही पाठिंबा असल्याचे सांगितल्या जात आहे. विशेष म्हणजे उद्यापासून कार्तिकी एकादशी सोहळ्याला सुरूवात होत आहे, तर 11 डिसेंबर रोजी ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा देखील आहे. मागण्या मान्य न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. प्रशासन स्थानिकांच्या मागणीची दखल घेणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.