Adhik Mass Wan : अधिक मासात जावायाला का देतात धोंड्याचे वाण? 33 आकड्याला का आहे विशेष महत्त्व
शिव भक्त ज्या प्रमाणे अधिक महिन्याची वाट पाहत असतात, त्याच प्रमाणे काही हौशी जावाईसुद्धा या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या महिन्यात जावायाला वाण देण्याचे महत्त्व आहे.
मुंबई : दर तीन वर्षातून एकदा अधिक महिना येतो. याला अधिक मास (Adhk Mas Wan) असेही म्हणतात. धार्मिक दृष्टीकोनातून या महिन्याला विशेष महत्त्व आहे. यंदा 18 जुलैपासून अधिक मासाला सुरूवात होत आहे. या महिन्यात शिव उपासना करण्याला देखील महत्त्व आहे. शिव भक्त ज्या प्रमाणे या महिन्याची वाट पाहत असतात, त्याच प्रमाणे काही हौशी जावाईसुद्धा या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. याचे कारण म्हणजे अधिक महिन्यात जावायाला मिळणारे धोंड्याचे वाण. या महिन्यात जावायाचे प्रचंड लाड पूरविले जातात. अधिक महिन्यात जावायाला इतके महत्त्व का आहे ते जाणून घेऊया.
काय असते धोंड्याचे वाण?
आपल्याकडे मुलगी आणि जावायाला लक्ष्मी नारायणाचा जोडा मानल्या जाते. अधिक मासात जावायाला दीप दान देण्याचेही महत्त्व आहे. हे पुण्यप्रत मानल्या जाते. अधिक महिना हा 33 दिवसांचा असतो. त्यामुळे या महिन्यात 33 या आकड्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या महिन्यात जावायाला वाण देतांना 33 अनारसे किंवा इतर तळणातले पदार्थ देण्याची पद्धत आहे. या सोबतच अनेक जण चांदीचा दिवा आणि सोन्याची भेटवस्तू देतात. अर्थातच सोन्या चांदिच्या वस्तू या वैकल्पित आहेत. प्रत्येक जण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार प्रथा पाळतो.
दीप दानाचे महत्त्व
भगवान विष्णू यांचा आशिर्वाद मिळविण्यासाठी दिप दानाला महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीवार्द मिळतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल चांदीचं का द्यावं तर लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे चांदीचं निरंजन द्यावं. जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहांचे वाईट परिणाम कमी होतात. म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलवतात. त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवतात. त्यासोबत 33 अनारसे, 33 बत्तासेसोबत एक चांदीचं निरांजन देतात. 33 दिव्याने जावयाला औक्षवान करतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)