साडे साती दूर करणाऱ्या शनिदेवाला आता स्वतःच्या हाताने करा तैलाभिषेक, शनिशिंगणापूर संस्थानची आजपासून सेवा, शुल्क किती?
हे तेल अभिषेक पावतीकरता भाविकांनी देवस्थानचे विक्री काऊंटर, देणगी काउंटर तसेच जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे सरचिटणीस अप्पासाहेब शेटे यांनी सांगितले.
अहमदनगरः अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शनी शिंगणापूर (Shani Shingnapur) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही शनिभक्त (Shani Devotee) दर्शनासाठी येत असतात. जीवनातील साडे साती घालवण्यासाठी अनेक भाविक शनीदेवाला तेलाचा अभिषेक घालतात. ही परंपरा असल्याने भाविक मोठ्या श्रद्धेने देवावर तेल अर्पण करत असतात. मात्र गेल्या काही वर्षापासून संस्थानने सुरक्षेच्या कारणास्तव भक्तांना चौथऱ्यावर जावून तेल घालण्यास मनाई केलेली होती.. चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करता यावा ही भक्तांची सातत्याने होत असलेली मागणी पाहता संस्थानने स्वीकारली आहे. भाविकांना ही सेवा देण्यासाठी सशुल्कसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.. आजपासून पुन्हा भक्तांना शनीदेवावर स्वतः तेल घालून पूजा करता येणार आहे ..
अभिषेकासाठी 500 रुपये शुल्क
श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टने विश्वस्त मंडलाच्या बैठकीत शनी चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्यासाठी शनिवारपासून परवानगी दिली आहे. ज्या भाविकांना शनी देवाला तेल अभिषेक करायचा असेल अशा भाविकांना शुल्क भरावे लागेल. मात्र सशुल्क सेवेसाठी कोणतीही सक्ती नसून ज्या भाविकांना झटपट दर्शन हवे त्यांचेकडूनच शुल्क आकारले जाणार असल्याच सस्थानच्यावतीने सागंण्यात आलं आहे. श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टची 500 रुपयांची देणगी पावती घेऊन शनी चौथऱ्यावर अभिषेक करता येईल.
कुठे फाडणार पावती?
हे तेल अभिषेक पावतीकरता भाविकांनी देवस्थानचे विक्री काऊंटर, देणगी काउंटर तसेच जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे सरचिटणीस अप्पासाहेब शेटे यांनी सांगितले. त्यामुळे राज्यभरातील भाविकांना आता शनिशिंगणापुरात दर्शनासाठी आल्यावर स्वहस्ताने तैलाभिषेक करता येणार आहे.