बापरे! पाच दिवसांत तब्बल इतक्या भाविकांनी केले बाबा अमरनाथचे दर्शन, असे आहे अमरनाथ गुहेचे वैशिष्ट्य
श्री अमरनाथ श्राइन बोर्डाच्या अधिकृत प्रवक्त्यानुसार, यात्रेकरूंना त्यांच्या संपूर्ण प्रवासादरम्यान राज्य संस्था आणि नागरी विभागांकडून सर्व आवश्यक गोष्टी आणि सुविधा पुरवून मदत केली जात आहे.
मुंबई : हिंदू धर्मात अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra 2023) विशेष महत्त्व आहे. ही यात्रा जितकी विशेष आहे तितकीच कठीणही आहे. 1 जुलै 2023 पासून जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रा सुरू झाली असून ती 31 ऑगस्ट 2023 पर्यंत चालणार आहे. यावेळी यात्रेच्या मार्गात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. पवित्र गुहेच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या जागी आयटीबीपी तैनात करण्यात आले आहे. गुहेशिवाय इतर अनेक ठिकाणी सुरक्षा दलांच्या तैनातीतही बदल करण्यात आला आहे. ITBP ला पर्वत आणि बर्फात काम करण्याचा भरपूर अनुभव आहे. या दलाला नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याचे प्रशिक्षणही दिले जाते.
दर्शन घेणाऱ्या भाविकांचा आकडा
श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने बुधवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की 1 जुलै 2023 रोजी यात्रा सुरू झाल्यापासून एकूण 67,566 यात्रेकरूंनी बाबा बर्फानीचे गुहेत दर्शन घेतले आहे. येत्या काही दिवसांत आणखी भाविक मंदिराला भेट देतील. 62 दिवस चालणारी श्री अमरनाथ यात्रा 31 ऑगस्ट 2023 रोजी संपणार आहे.
बुधवारी, बालटाल बेस कॅम्प आणि नुनवान बेस कॅम्प या दोन्ही ठिकाणांहून 18,354 यात्रेकरू अमरनाथसाठी रवाना झाले. अमरनाथ यात्रेदरम्यान या दोन्ही मार्गांनी भाविक मंदिरापर्यंत पोहोचतात. अमरनाथ यात्रेदरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, यामध्ये 12483 पुरुष, 5146 महिला, 457 मुले, 266 साधू आणि 2 साध्वींचा समावेश आहे. सुरुवातीपासून भेट दिलेल्या यात्रेकरूंची एकूण संख्या 67566 असल्याचे सांगण्यात आले. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी ITBP, BSF आणि CRPF सारख्या यंत्रणा तैनात आहेत.
प्रतिकुल परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज
श्री अमरनाथ श्राइन बोर्डाच्या अधिकृत प्रवक्त्यानुसार, यात्रेकरूंना त्यांच्या संपूर्ण प्रवासादरम्यान राज्य संस्था आणि नागरी विभागांकडून सर्व आवश्यक गोष्टी आणि सुविधा पुरवून मदत केली जात आहे. एनडीआरएफ टीम कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीसाठी सज्ज असून ड्रोनच्या माध्यमातून शिखरांवर नजर ठेवत आहेत.
पोलीस, SDRF, लष्कर, निमलष्करी दल, आरोग्य, PDD, PHE, ULB, माहिती, कामगार, अग्निशमन आणि आपत्कालीन परिस्थिती, शिक्षण आणि पशुसंवर्धन यासह सर्व विभागांनी श्री अमरनाथजी यात्रेच्या एकूण गरजा आणि व्यवस्था पूर्ण करण्यासाठी त्यांचे कर्मचारी तैनात केले आहेत.
चंद्राच्या आकारानुसार कमी जास्त होते उंची
इतकेच नाही तर बर्फाणी बाबाची उंची चंद्राच्या आकाराप्रमाणे कमी होत राहते. म्हणजेच पौर्णिमा असते तेव्हा शिवलिंग पूर्ण आकारात असते. दुसरीकडे, अमावस्येच्या दिवशी शिवलिंगाचा आकार थोडा कमी होतो. अमरनाथ गुहेचा शोध बुट्टा मलिक नावाच्या मेंढपाळाने लावल्याचे मानले जाते. मेंढ्या चरायला निघालेला बुट्टा मलिक लांबवर पोचला असताना वाटेत त्याला एक साधू भेटला ज्याने त्याला कोळशाची पिशवी दिली. घरी गेल्यावर बट्टा मलिकने जेव्हा ती पिशवी पाहिली तेव्हा त्याला आश्चर्य वाटले कारण कोळशाचे सोन्यामध्ये रूपांतर झाले होते. बुट्टा मलिक त्या साधूच्या शोधात निघाला तेव्हा त्याला अमरनाथ गुहा दिसली पण साधू तिथे नव्हता. तेव्हापासून हे ठिकाण तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)