Ekadashi 2023 : आमलकी एकादशीला 3 अद्भुत योग, अशा पद्धतीने पूजा करून मिळवा शीघ्र फळ
हिंदू पंचांगानुसार वर्षाला 24 एकादशी येतात. प्रत्येक एकादशीचं विशेष असं महत्त्व आहे. यंदा 3 मार्चला येणाऱ्या आमलकी एकादशीला पूजा केल्याने विशेष फळ मिळतं.
मुंबई : हिंदु पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. एक एकादशी शुल्क पक्षात, तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात येते. प्रत्येक एकादशीचं वेगळं असं महत्त्व आहे. त्यात फाल्गुन महिन्यातील शुल्क पक्षातील आमलकी एकादशीचं व्रत महत्वपूर्ण मानलं जातं. या वर्षी आमलकी एकादशी 3 मार्च 2023 रोजी असणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी तीन योग जुळून आले आहेत. या दिवशी आवळ्याने भगवान विष्णुंची पूजा केली जाते. होळीपूर्वी येणाऱ्या एकादशीला पार्वती देवी शिवांसोबत काशीला आली होती, अशी अख्यायिका आहे. या दिवशी या जोड्यांचं रंगाची उधळण करत स्वागत करण्यात आलं होतं. या दिवशी शिवगण महादेवांसोबोत गुलालाची होळी खेळले होते. त्यामुळे आमलकी एकादशी महत्त्व आणखी वाढते.
आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णु प्रसन्न होतात. आवळ्याच्या झाडात ब्रह्मा, विष्णु आणि शिवाचा वास असतो, असं मानलं जातं. त्यामुळे आमलकी एकादशीला हरी आणि शिवाची एकत्र पूजा केली जाते. यामुळे विवाहातील अडचणी दूर होतात. त्याचबरोबर वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आवळ्याच्या रसाने हरिंचा अभिषेक करावा. दुसरीकडे शिवलिंगावर गुलाल अर्पण करावा. यामुळे लग्नातील अडचणी दूर होतात.
आमलकी एकादशी 2023 शुभ योग
आमलकी एकादशीला या वर्षी तीन योग जुळून येत आहेत. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, सौभाग्य आणि शोभन योग एकत्रित आले आहेत. सौभाग्य योग आपल्या नावानुसार फळ देतो. तसेच सर्वार्थ सिद्धी योगात भगवान विष्णुंची पूजा केल्याने कामात अपेक्षित यश मिळतं.
- सौभाग्य योग – 2 मार्च 2023, संध्याकाळी 5.51 मिनिटं ते 3 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6.45 मिनिटांपर्यंत
- शोभन योग – 3 मार्च 2023, संध्याकाळी 6.45 मिनिटं ते 4 मार्च 2023 रात्री 7.37 मिनिटापर्यंत
- सर्वार्थ सिद्धी योग- 03 मार्च 2023 सकाळी 6.47 मिनिटं ते दुपारी 3.43 मिनिटांपर्यंत
- पारण विधी – 4 मार्च 2023 रोजी, सकाळी 6 वाजून 48 मिनिटं ते सकाळी 9 वाजून 9 मिनिटांपर्यंत
व्रत कथा
पौराणिक कथेनुसार या दिवशी ब्रह्मदेव भगवान विष्णुंच्या नाभीतून उत्पन्न झाले होते. यावेळी ब्रह्माने स्वत:ला जाणून घेण्यासाठी परब्रह्माची तपस्या केली. त्यामुळे प्रसन्न होत भगवा विष्णु प्रकटले. त्यावेळी भगवान विष्णुंना पाहून ब्रह्मांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांचे अश्रू भगवान विष्णुंच्या चरणावर पडत असताना त्याचं रुपांतर आवळ्याच्या वृक्षात झालं. त्यानंतर आवळा आजपासून मला प्रिय असेल असं भगवान विष्णुंनी सांगितलं. त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या वृक्षाची विधिवत पूजा केल्यास मोक्षाकडे वाटचाल सुरु होते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)